योगी आदित्यनाथ यांनीही दिली होती उपमा
देवरिया (उत्तर प्रदेश) – उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचा प्रचार रंगत असताना राजकीय नेत्यांनी एकमेकांवर वैयक्तिक टीका करायला सुरुवात केली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी समाजवादी पार्टीचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर वैयक्तिक टीका केली आहे.
अखिलेश म्हणजे आजच्या काळातील औरंगजेब असल्याची टीका शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे. उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या सभेमध्ये ते बोलत होते. अखिलेश यादव हे आजचे औरंगजेब आहेत, हे स्वतः मुलायम सिंह यादवच म्हणत असत. औरंगजेबाने आपल्या स्वतःच्या वडिलांना तुरुंगात टाकले.
भावांना मारून टाकले. ज्याप्रमाणे अखिलेश यादव यांनी आपला अपमान केला तसा आतापर्यंत कोणीही केला नव्हता, असे मुलायम सिंह म्हणाले होते, याचा दाखला शिवराज सिंह चौहान म्हणाले.
यापूर्वी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळी योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यादव यांना औरंगजेबाची उपमा दिली होती. औरंगजेबाने वडील शाहजहांन यांना तुरुंगात टाकून सत्ता मिळवली होती, त्याच संदर्भाने ही उपमा दिली गेली आहे. अखिलेश यांच्याकडून मात्र चौहान यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले गेलेला नाही.