बारामती/ जळोची: तुम्ही शरद पवार यांचा प्रचार करु नका. या प्रकारच्या धमक्या गुंडांकडून सर्वसामान्यांना दिल्या जात आहेत. याबाबत आम्हाला सर्वसामान्यांकडून माहिती मिळत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात अशी प्रथा यापूर्वी कधीही नव्हती. या प्रथेला यश आल्यास यापुढे फक्त गुंडांना पाळले जाईल, विकास कोणीही करणार नाही. दडपशाहीचे राजकारण वाढत जाईल, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
कन्हेरी (ता. बारामती) येथे आयोजित बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पवार यांनी हा आरोप केला आहे. ते म्हणाले, अजितदादा मित्र मंडळाचा पक्ष, त्या पक्षाचे लाभार्थी व काही भाजपचे नेते बारामती लोकसभा मतदारसंघातील पदाधिकार्यांना धमकावत आहेत, असे आमचे मत आहे, असा आरोप रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह भाजप नेत्यांचे नाव न घेता केला आहे.
यावेळी त्यांनी थेट अजित पवार यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, बारामतीची जनता ज्यांना मलीदा गॅंग म्हणून ओळखते.
असे काही लाभार्थी व ठेकेदार मंडळी सर्वसामान्यांना धमकावत आहेत. यामध्ये पीडीसीसी बॅंकेचे पदाधिकारी कर्मचारी देखील सर्वसामान्य शेतकर्यांना कर्ज वैगैरे प्रकरणात तुमची संपत्ती जप्त करु अशा पध्दतीने धमकावत आहेत. शहरी भागात गुंडांचा वापर होत आहे. या भागात रहायचे असेल तर तुम्ही पवार यांचा प्रचार करु नका, असे सांगितले जात असल्याचा आरोप देखील रोहित पवार यांनी केला.
धाडस असेल तर भावाचे नाव घ्या
बारामती लोकसभा मतदारसंघात नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मेळावा पार पडला. यावेळी पवार यांनी माझी भावंड कधी माझ्या प्रचारात फिरली नाहीत. आता मात्र गरागरा पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. मी फार तोलून मापून बोलत आहे. मी जर तोंड उघडल तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही, अशी टीका केली होती. टीकेला रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. रोहित पवार म्हणाले, अजित पवार त्यांच्या भावांची बदनामी का करीत आहेत. तुमच्यात जर धाडस असेल तर त्या भावांचे नाव घ्या. काय प्रकरण आहे ते कळू द्या.