पुणे – पुणे-मुंबई दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी “लाईफलाईन’ असणाऱ्या डेक्कन क्वीनला नवीन “लूक’ मिळाला आहे. आता लवकरच नव्या रंगसंगतीतील कोचेससह रेल्वे धावणार आहे.
पुणे-मुंबई मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीनच्या रंगसंगतीमध्ये बदल करण्यात आला. पूर्वी निळ्या आणि पांढऱ्या रंगात, तर सध्या एलएचबी कोचेससह धावणारी डेक्कन क्वीनचे रुपडे आता पालटणार आहे. कोच फॅक्टरी येथून नवीन काही कोचेसदेखील मध्य रेल्वेत दाखल झाले आहेत. डेक्कन क्वीन मार्च महिन्यादरम्यान नव्या रंगात धावण्याची शक्यता आहे. अहमदाबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (एनआयडी) येथे डेक्कन क्वीनची रंगसंगती निश्चित करण्यात आली आहे. “एनएसडी’ने डेक्कन क्वीनच्या रंगाबाबत सर्वेक्षण केले होते.
डायनिंग कारच्या रचनेत बदल
डेक्कन क्वीनला “फॉरेस्ट ग्रीन’, पिवळा आणि लाल हे रंग दिले आहेत. यासह डायनिंग कारच्या रचनेतदेखील बदल केला आहे. 2019 पासून एनआयडीकडून रंगसंगती निवडण्याची प्रक्रिया राबविण्यात येत होती. तर, 2020 मध्ये नियोजित रंगाला रेल्वे बोर्डाने मान्यता दिली होती. रेल्वेचे हे नवीन कोचेस जानेवारी 2022 पासून जोडण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, हा मुहूर्त लांबणीवर पडला होता. आता काही कोचेस मध्य रेल्वेकडे दाखल झाल्याने दोन वर्षांपासून स्वप्नवत वाटणारा प्रवास आता प्रत्यक्षात अनुभवता येणार आहे.