अजितदादा फोनवर पालिका, जिल्हा परिषद चालवायचे

पाणी प्रश्‍नावर केलेल्या टीकेला गिरीश बापट यांचे उत्तर

पुणे – आमच्या पक्षात आम्ही एकमेकांच्या कारभारात ढवळाढवळ करत नाही; परंतु अजित दादांना ती सवय असून ते फोनवर पालिका आणि जिल्हा परिषद चालवत होते. त्यामुळेच त्यांच्यावर आज ही वेळ आली आहे. अशा शब्दात खासदार गिरीश बापट यांनी अजित पवार यांना टोला लगावला.

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर आता आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडू लागल्या आहेत. रविवारी अजित पवार यांनी एका मेळाव्यात पुण्यातील पाणी प्रश्‍नावर सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली.

यावेळी त्यांनी पालकमंत्री कारभारात लक्ष घालत नसल्यामुळेच शहरात पाणी प्रश्‍न निर्माण झाल्याचे सांगितले. अजित पवार यांच्या या वक्‍तव्यांचा समाचार घेताना बापट म्हणाले, भाजपमध्ये एकमेकांच्या कामात ढवळाढवळ करण्याची पद्धत नाही. पालिकेतील महापौर, सभागृह नेता हे सक्षम आहेत. शहराच्या प्रश्‍नांची आम्हाला चांगली जाण आहे. 24 बाय 7 पाण्याचा प्रश्‍न आम्ही दिलेल्या वेळेत सोडवू, भामा-आसखेडचे पाणी सुद्धा शहराला मिळणार आहे. यामध्ये कोणी आडकाठी घालू नये अन्यथा कारवाई केली जाईल.

पुण्यातील 8 ही जागा या भाजपकडून लढविण्यात येणार असल्याचे सुद्धा स्पष्ट केले. सेनेला कुठला मतदार संघ देणार याबाबतचा निर्णय हा वरिष्ठ नेते घेणार आहेत, पण आम्ही 8 ही जागा लढविणार आहोत. यंदा जिल्ह्यात सुद्धा आम्हाला चांगले यश मिळेल, अशी अशा बापट यांनी व्यक्‍त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.