जनतेने सरकारविरोधात पेटून उठावे – अजित पवार

भाजपला सत्तेची मस्ती, नशा चढल्याचा घणाघात

पुणे – भाजपच्या महाजनादेश यात्रेत राष्ट्रवादी व इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांची धरपकड केल्याने राज्यात सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. भाजपला सत्तेची मस्ती आणि नशा चढली आहे. यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत जनतेने सरकारविरोधात पेटून उठावे, असे सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला.

शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याप्रसंगी पवार बोलत होते. यावेळी खासदार वंदना चव्हाण, शहराध्यक्ष चेतन तुपे, माजी आमदार बापू पठारे, अंकुश काकडे, प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी, पालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, शेख सुबानअली, सूरज चव्हाण, महेश शिंदे आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, राज्यभरातील तरुण कार्यकर्ता राष्ट्रवादीबरोबर जोडला गेला आहे. मागील निवडणुकीतील मतभेद विसरून कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षांचे प्रामाणिकपणे काम करावे. मागील 5 वर्षांत नरेंद्र मोदी व मुख्यमंत्र्यांनी केलेला विकास दिसला नाही. भाजप केवळ जनतेला आश्‍वासन देऊन फसवणूक करत आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत समविचारी पक्षाची मते एकत्र आणल्यास निश्‍चितपणे सत्ता मिळणार असल्याचा विश्‍वास पवार यांनी व्यक्‍त केला.

चव्हाण म्हणाल्या, येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ध्येयधोरणे लोकांपर्यत पोहोचविण्याची गरज आहे. तसेच, मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या पक्षांतरात पुण्यातील कोणीही पदाधिकारी पक्ष सोडून गेला नसल्याने शहरातील राष्ट्रवादीची ताकत दिसून आली आहे, असे त्यांनी सांगितले.

छत्रपतींच्या दोन गादींमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न
छत्रपती शिवाजी महाराजांची साताराची गादी व शाहू महाराजांची कोल्हापूरची गादी समान आहेत. या दोन गाद्यांमध्ये फरक दाखवून चंद्रकांत पाटील हे भांडणे लावण्याचे काम करत आहेत. याचबरोबर भाजपने उदयनराजेंना पक्षात घेऊन फसवणूक केल्याचे अमोल मिटकरी यांनी सांगितले.

चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे
भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेदरम्यान पुन्हा मीच मुख्यमंत्री होणार, सत्ता भाजपचीच येणार, असा विश्‍वास व्यक्‍त केला; परंतु प्रत्येकाचे दिवस येत असतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस “चार दिवस सासूचे, “चार दिवस सुनेचे’ असल्याने कार्यकर्त्यांना गृहीत धरू नका, घरी बसाल… अशी टीका अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.

Leave A Reply

Your email address will not be published.