‘जरंडेश्‍वर’मधून अजित पवारांना हाकलणार

डॉ. शालिनीताई पाटील यांचा निर्धार : जावळीचं पार्सल परत पाठविणार

कोरेगाव – जरंडेश्‍वर सहकारी साखर कारखान्याची उभारणी ही सामान्य शेतकऱ्यांच्या कष्टातून झालेली आहे. कारखाना मोडून खाणाऱ्या अजित पवार यांना कारखान्यातून हाकलून काढणार आहे. त्याचबरोबर कोरेगाव विधानसभा मतदारसंघात ढाबा संस्कृती रुजविणाऱ्या जावळीकराला आता परत पाठविण्याची वेळ आली असून, ते कामसुद्धा करणार आहे, असा निर्धार माजी मंत्री डॉ. श्रीमती शालिनीताई पाटील यांनी केला. सक्रिय राजकारणाला 60 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

“युवा पिढी बरबाद करण्याचे पाप शशिकांत शिंदेचेच’
कोरेगावातून दहा वर्षे आमदार म्हणून मी प्रामाणिकपणे काम केले. तालुक्‍यात दर्जेदार आणि ठोस विकास कामे केली. औद्योगिक वसाहतीचा आराखडा देखील मंजूर झाला होता, मात्र दहा वर्षात त्यावर एक रुपयाचेही काम झाले नाही, असे सांगत डॉ. पाटील म्हणाल्या, “2009 मध्ये मी पुन्हा आमदार होऊ शकले असते, मात्र बारामतीतून ट्रकभर पैसा आणला. सर्वच ढाब्यांवर मटणाच्या जेवणावळी रंगल्या आणि दारुचा महापूर आला. युवापिढीला व्यसनाधीन करत बरबाद केले. त्यांच्या या आक्राळविक्राळ ताकदीपुढे आमची ताकद कमी पडली आणि माझा पराभव झाला. शशिकांत शिंदे स्वतःचा पैसा व्हाईट करायला येथे आले, दहा वर्षे आमदार आहे, मात्र त्याने कोणतेही ठोस आणि विधायक काम केले नाही. ढाबा संस्कृतीद्वारे त्याने युवापिढी बरबाद केली.” हे सर्व रोखण्यासाठी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी पुन्हा कोरेगाव तालुक्‍यात सक्रिय होणार आहे. जावळीचे पार्सल परत जावळीला पाठविण्यासाठी विधानसभा निवडणुकीत योग्य आणि चांगल्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे. त्याच्या विजयासाठी देखील प्रयत्न करणार आहे, असे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.

“फलटण-बारामतीला पाणी जाऊ देणार नाही’
कोरेगावात दहा वर्षे आमदार म्हणून मिरवत असलेल्याने अजित पवार यांनाच साथ दिली आहे. मात्र, कारखाना आणि शेतकऱ्याच्या विषयावर ते काहीच बोलत नाही. गेल्यावर्षी कारखान्याने जाहीर केलेला ऊसाचा दर दिलेला नाही, त्याबाबत बोलत नाही. कोरेगाव तालुक्‍याच्या हक्काचे पाणी फलटण- बारामतीला जात आहे. धोम धरणाची उभारणीवेळी कोरेगाव तालुक्‍यासाठी पाणी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्याची अंमलबजावणी होत नाही. मंत्रालयात पाणी वाटपाच्या बैठकांना आमदार उपस्थित राहत नाही, याचा अर्थ त्याची पाणी नेण्याला संमती आह, असा दावा त्यांन केला. आता कोरेगावचे पाणी नेण्यास आमचा कडवा विरोध राहणार आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमच्या वाट्याचे पाणी देणार नाही, त्यासाठी वेळप्रसंगी लढा उभारावा लागला तरी चालेल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)