नव्याने भरती झालेले वाहक, चालक संतप्त; एसटी महामंडळ प्रशासनाकडून दखल नाही
पुणे – एसटी महामंडळात नव्याने भरती होत असलेल्या वाहक आणि चालकांकडून महामंडळाच्या नियमानुसार फिटनेस सर्टिफिकेटसाठी अवघा शंभर रुपयांचा दर असतानाही महामंडळाच्यावतीने नेमण्यात आलेल्या पॅनेलवरील डॉक्टरांनी या उमेदवारांकडून चक्क पाचशे ते हजार रुपये उकळले. त्यामुळे हे उमेदवार चांगलेच संतप्त झाले आहेत. उमेदवारांनी महामंडळाच्या प्रशासनाकडे तक्रार करूनही प्रशासनाने त्याची कोणतीही दखल घेतली नाही.
एसटी महामंडळाच्या वतीने वाहक, चालक आणि अधिकारी पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानुसार या प्रवर्गाची राज्यभरात तब्बल दहा हजार पदे भरण्यात येणार आहेत. त्यामध्ये पुणे विभागात सर्वाधिक पदे भरण्यात येणार आहेत. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या महिन्यात या भरतीची प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया काही प्रमाणात थंडावली होती. आता या भरतीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानुसार अंतिम टप्पा म्हणून उमेदवारांची शारीरिक तपासणी करण्यात येणार आहे. आगामी प्रक्रियेसाठी हे फिटनेस सर्टिफिकेट तत्काळ देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
त्यामुळे या उमेदवारांना सोयीचे व्हावे यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने एमबीबीएस डॉक्टरांचे पॅनेल नेमण्यात आले आहे. महामंडळाच्या वतीने या डॉक्टरांना मानधन देण्यात येते. त्याशिवाय कागदपत्रे आणि अन्य खर्चासाठी त्यांना उमेदवारांकडून प्रत्येकी शंभर रुपये घेण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यासंदर्भात महामंडळाने सर्व उमेदवारांना तशी कल्पनाही देण्यात आली आहे. मात्र हे उमेदवार शारीरिक चाचणीसाठी गेल्यानंतर त्यांना वेगळाच अनुभव आला. त्यांना संबंधित डॉक्टर आणि त्यांच्या कामगारांकडून चक्क पाचशे ते हजार रुपयांची मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे ही रक्कम न दिल्यास शारीरिक चाचणी करण्यात येणार नाही, त्याशिवाय सर्टिफिकेटही देण्यात येणार नाही अशी अडवणूक डॉक्टरांनी केली. त्यामुळे नाईलाजाने ही रक्कम देण्याची वेळ आली, अशी खंत काही उमेदवारांनी “प्रभात’शी बोलताना व्यक्त केली.
शारीरिक चाचणीसाठी महामंडळाने ठरवून दिलेलीच रक्कम घ्यावी,असे आदेश सर्व डॉक्टरांना दिले आहेत. मात्र, काही ठिकाणी उमेदवारांकडून जादा पैसे घेत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्याची गंभीर दखल महामंडळाने घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सर्व केंद्रांवर महामंडळाचे अधिकारी अथवा कर्मचारी नजर ठेवणार आहेत. त्यानुसार आक्षेपार्ह प्रकार आढळल्यास महामंडळाच्या वतीने कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
– यामिनी जोशी विभागीय नियत्रंक, एसटी महामंडळ, पुणे विभाग