मुंबई – राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात फूट पडून शरद पवार गट आणि अजित पवार गट तयार झाले. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारसोबत हातमिळवणी करून सत्तेत सहभागी झाले. तर शरद पवार यांनी महाविकास आघाडीसोबत राहिले. आमदार खासदारही दोन्ही गटात विभागले गेले. काही सत्तेत तर काही विरोधक. मात्र अनेकदा अशा काही घटना लोकांच्या नजरेत आल्या की अजित पवार आणि शरद पवार गटातील नेते एकच असल्याचा आरोपही अनेकांनी केला. ज्यावेळी शरद पवार आणि अजित पवार एकत्र दिसतात तेंव्हा या चर्चांना उधाण येते. मात्र याबाबत आता अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. आम्ही भूमिका घेतली असून त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केलंय.
काय म्हणाले अजित पवार ?
आता आपण पुढे गेलो आहोत, कुठेही मॅचफिक्सिंग नाही, आपण भूमिका घेतलीये, त्यामध्ये बदल होणार नाही, असं मी स्टॅम्पपेपरवर लिहून देतो, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हंटलं आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच आता आपण जी भूमिका घेतली आहे, त्यावर ठाम राहायचे, असं देखील अजित पवारांनी यावेळी म्हटले.
मार्च महिन्यात आचारसंहिता लोकसभा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे संघटनात्क काम वाढविण्याकडे लक्ष द्या. कारण लोकसभेनंतर चार महिन्यातच विधानसभा लागणार आहेत, अशा सूचना देखील अजित पवारांनी या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मंत्रालयाजवळील महिला विकास मंडळ सभागृहात राष्ट्रवादींच्या बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला अजित पवार यांच्यासह सुनील तटकरे देखील उपस्थित होते.
दरम्यान, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची राज्यासह देशभरात सर्व पक्षियांकडून तयारी सुरु झाली आहे. जागावाटपावरून सर्व पक्षांच्या आघाड्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरु आहे. अजित पवारांनी आपली भूमिका आज पुन्हा स्पष्ट केली की ते शरद पवार यांच्या गटाबरोबर जाणार नसून शिंदे-फडणवीस सरकारमध्येच राहणार आहेत. त्यांच्याशी विचारविनिमयानेच पुढील रणनिती ठरणार आहे.