Nagpur winter session – नागपुरात सोमवारपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीची एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर विरोधकांनी पत्रकारपरिषद घेत मुख्यमंत्र्यांच्या आजच्या चहापानावर बहिष्कार घातल्याचे जाहीर केले. यावेळी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, काँग्रेस नेते नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ आदी नेतेमंडळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना, अजित पवार यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांसाठी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. राज्याच्या विकासाच्या दृष्टीने मनमोकळी अनौपचारिक चर्चा होईल, या हेतूने आम्हाला बोलावलं होतं. पण आम्ही आता सगळ्यांनी चर्चा केली, त्या चर्चेत साधारण सहा महिने झाले हे सरकार सत्तेवर येऊन, या कालावधीत ज्या काही अफेक्षा होत्या पूर्ण झाल्यात असं आम्हाला अजिबात वाटत नाही.
“महापुरुषांबाबत सातत्याने बेताल वक्तव्यं करणं, अपशब्द बोलणं हे सतत सुरूच आहे. राज्यपाल, मंत्री, आमदार हे बोलत आहेत आणि त्यात भर टाकण्याचंच काम करत आहेत. काही बाबतीत माफी मागण्यासही तयार नाहीत. हे महाराष्ट्राला अजिबात पसंत नाही. हा एक आमचा मुद्दा आहे.”
चहापानावर बहिष्कार घालत असल्याचे सांगताना अजित पवार यांनी, “स्वविचाराने व महाराष्ट्र हिताचा कारभार हाताळण्याचा अभाव सर्वच क्षेत्रात दृष्टीस येत असताना, मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमास उपस्थित राहणे आम्हाला योग्य वाटत नाही. आपण आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमास उपस्थित न राहण्याचा निर्णय आम्ही सर्वानुमते घेतलेला आहे, लोकशाहीच्या प्रथा परंपरेप्रमाणे विधीमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस चहापान कार्यक्रमास निमंत्रित केल्याबद्दल पुन्श्च आभार, धन्यवाद.” अशी भूमिका मांडली.