Vijay Vadettiwar : अजित पवार (Ajit pawar) यांनी शिंदे- फडणवीस सरकारसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र या राजकीय घडामोडीनंतर अजित पवार सत्तेत नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. निधी वाटपावरून काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवा र(Vijay Vadettiwar) यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. तसेच अजित पवार यांना पुढच्या वेळेस निवडणूक भाजपच्या तिकीटावर लढावे लागेल, असा दावा देखील वडेट्टीवार यांनी केला आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, “अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत अजित पवारांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवल्याचंही बोललं जात आहे. शिंदे गटाला अधिक विकास निधी दिला जातो तर अजित पवार गटाला तुलनेनं कमी विकास निधी दिला जातो, अशी तक्रार अजित पवारांनी अमित शाहांकडे केल्याचं समजत आहे.’
पुढे ते म्हणाले, “अजित पवार कधी खूश असतात? ते नेहमीच नाराज असतात. त्यांच्या मनाप्रमाणे झाले, तर ते खूश होतात. मनाविरुद्ध झाले, तर नाराज. ‘हम करे सो कायदा’अशा पद्धतीने त्यांची भूमिका असते. आता तीन पक्षांच्या सरकारमध्ये त्यांना वाटतं की, निधी मिळत नाही. अरे तिजोरीची चावीच तुमच्याकडे आहे, मग तुम्ही दुसऱ्यांकडे तक्रार का करता? आता तुमची धमक दाखवा. महाविकास आघाडीत धमक दाखवून तुम्ही सर्व तिजोरी साफ करत होता. आता ही धमक दादांनी सोडली. त्यामुळे निधी मिळत नाही म्हणून रडण्यापेक्षा रडवण्याची हिंमत आहे का?” असा सवाल त्यांनी विचारला.
“दिल्लीचे चरणदास झालेले आता इकडे चरणदास आपली दादागिरी दाखवू शकणार नाही. दिल्लीला जाऊन तक्रार केली. भाजपसोबत जाणाऱ्यांना रडवून रडवून सडवतात, आता रडण्याची आणि सडण्याची स्थिती अजित पवारांवर आली असावी. अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्यांना कमळावर लढल्याशिवाय पर्याय नाही हे मी खात्रीने सांगतो,” असा ठाम विश्वासही वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.