बारामती (प्रमोद ठोंबरे) -विकासाचा पॅटर्न म्हणून बारामतीची राज्यात आणि देशासह परदेशात ओळख निर्माण झाली आहे. सामाजिक, औद्योगिक, सहकार, आर्थिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात तालुका पातळीवरील बारामतीचा झालेला विकास आदी पायाभूत सुविधांमुळे बारामतीच्या बांधकाम व्यवसायाला चालना मिळाली आहे. सुरक्षित असणाऱ्या बारामती शहरात आपलं घर असावे, असे अनेकांना वाटत आहे. त्यामुळे बारामती शहरात घरांना वाढती मागणी आहे. आपल्या हक्काचे घर बारामतीत घेण्यासाठी दसरा, लक्ष्मीपूजन, दिवाळीतील पाडव्याचा मुहूर्त ग्राहक साधत आहेत. यंदा दीपावलीनिमित्त दर्जेदार प्रकल्पासाठी ग्राहकांची पसंती वाढली आहे.
“स्वच्छ सुंदर व हरित बारामती’ शहरात घर घेण्याकडे नागरिकांचा वाढता कल आहे. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांच्या धर्तीवर बारामती शहरात बांधकाम व्यवसायाकडून सुविधा पुरविल्या जात आहेत. शहरातील विविध उपनगरात मोठे गृहप्रकल्प उभे राहत आहेत. पुणे, मुंबईसारख्या शहरात घर घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.
बारामती शहराचा विकासाचा तसेच हरित पॅटर्नबरोबरच बारामतीची शैक्षणिक हब म्हणून ओळख निर्माण झाली आहे. औद्योगिक विकासामुळे हजारो हातांना काम मिळत आहे. नोकरी व शिक्षणाची सोय तसेच राहण्यासाठी उत्तम शहर म्हणून बारामतीकडे पाहिले जात आहे. त्यामुळे घरांची मागणी वाढत आहे. इतर शहरांप्रमाणे बारामती शहरात वाहतूक कोंडी नाही. प्रदूषणमुक्त शहर म्हणून बारामतीची ओळख आहे. गृहकर्ज देण्यासाठी 50 हून अधिक बॅंका उपलब्ध आहेत. त्यामुळे बारामती शहरात स्थायिक होणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. शहराचा विकास गतीने होत आहे. त्यामुळे कमी खर्चात तालुका पातळीवर सोयी- सुविधा उपलब्ध होत असल्याने घर खरेदीकडे कल आहे.
सांगवी बिल्डरचे संजय संघवी, चव्हाण बिल्डरचे प्रताप चव्हाण, आदित्य ग्रीन सिटीचे हरिभाऊ काळे, खत्री अँड खाटमोडे बिल्डकॉनचे आशिष खत्री व राहुल खाटमोडे, पी. एम. बिल्डर्सचे पांडुरंग मासाळ, काटे बिल्डर अँड डेव्हलपर्सचे दीपक काटे, सोहम इंटरप्राईजेसचे सागर काटे, आदींसह विविध बांधकाम व्यावसायिक बारामती शहराच्या विविध भागात गृहप्रकल्प तसेच व्यावसायिक प्रकल्प उभारत आहेत.
पुणे, मुंबईसारख्या शहरांच्या धर्तीवर बारामतीत ग्राहकांना सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. कल्पकतेनुसार गृहरचना करीत सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील, अशी घरे देण्याचा या बांधकाम व्यावसायिकांचा प्रयत्न आहे. लक्झरीयस फ्लॅट, बंगलो व रो- हाउसेसची निर्मिती देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. सर्वसामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांच्या मागणीनुसार प्रकल्प उभे राहत आहेत.