सध्या करोनामुळे हिंदी चित्रपटसृष्टी कठीण अवस्थेतून जात आहे; परंतु लॉकडाऊन संपताच चित्रपट निर्माते पुढील गोष्टींबद्दलच्या योजना आखत आहेत. बॉलिवूड अभिनेता अजय देवगण लवकरच “भूज’ चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय तो अजून एका प्रोजेक्टवर काम करत असून याबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. या चित्रपटाचे नाव “चाणक्य’ असून यात अजय देवगण चाणक्यची भूमिका साकारताना दिसणार आहे.
या चित्रपटाची अजय देवगणने तयारी सुरू केली असून यासाठी तो लवकरच मुंडण करण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दशकांपासून देश-विदेशात चाणक्यच्या शिकवणीचा अभ्यास केला जातो. तसेच अनेक टीव्ही शो झाल्याने लोकांच्या मनात चाणक्यांची विशेष प्रतिमा तयार आहे. कपाळावर चंदन, सन्यांसी वस्र आणि टक्कल डोक्यावर लांब शेंडी. आता या लूकमध्ये अजयला पाहण्यासाठी फॅन्स उत्सुक आहेत.
याबद्दल दिग्दर्शक नीरज पांडे म्हणाले, या भूमिकेसाठी अजय देवगणला तसाच लूक घ्यावा लागेल आणि ते खूपच सोपे आहे. आम्ही एक पीरियड ड्रामा करणार आहोत आणि अजयलाही तोच लूक ठेवावा लागेल. दरम्यान, 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला असून सर्व परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतरच चित्रपटाच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे समजते.