नवी दिल्ली – बनावट आधारकार्डाद्वारे विमान प्रवास केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले समाजवादी पक्षाचे आमदार इरफान सोलंकी यांनी जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, परंतु त्यांची ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
याआधी अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांची जामीन याचिका नाकारली होती. त्यामुळे त्यांनी हायकोर्टाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तेथे न्यायमूर्ती एस रवींद्र भट आणि अरविंद कुमार यांच्या खंडपीठाने सोलंकी यांना दिलासा देण्यास नकार दिला.
सोलंकी यांनी आपल्या याचिकेत दावा केला आहे की आपण उत्तर प्रदेशातील अल्पसंख्याक समाजातील एक राजकीय व्यक्तिमत्व असल्याने, ते वारंवार होणाऱ्या दुर्भावनापूर्ण खटल्यांना सामोरे जात आहेत आणि सध्याची केस देखील राजकीय सूडबुद्धीने दाखल करण्यात आली आहे. आमदार इरफान सोलंकी यांच्या विरोधात एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. त्यातील 4 गुन्ह्यांमध्ये त्यांना जामीन मिळाला आहे.
सोलंकी यांनी दावा केला की, त्यांना खोट्या खटल्यात अडकवण्यात आले आहे.11 नोव्हेंबर 2022 रोजी इंडिगो फ्लाइटने नवी दिल्ली ते मुंबई असा प्रवास करण्यासाठी त्यांनी बनावट आधार कार्डाचा वापर केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.