मुंबई – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून जालना येथे मनोज जरांगे उपोषण करत आहेत. दरम्यान जरांगेंच्या मागणीपायी मुख्यमंत्री एकनाथ (Eknath Shinde) शिंदे बुधवारी संध्याकाळी पाच वाजता आंतरवली सराटी गावाला भेट देणार होते. याबाबत मुख्यमंत्री शिंदेंचा दौरा देखील आला होता.
त्यानुसार त्यांचे 4.30 वाजता औरंगाबाद गाठूण तेथून हेलिकॉप्टरने जालना येथील अंकुशराव टोपे साखर कारखान्यात त्यांचे आगमन होणार होते. मात्र सायंकाळी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत घेत जरांगेंसोबत आमची अद्यापही चर्चा सुरू असल्याचे म्हटले. अन् नंतर मुख्यमंत्रांचा हा दौरा आता रद्द झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शिंदे जरांगेंच्या भेटीला बुधवारी सायंकाळी जाणार त्यापूर्वीच त्यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासोबतच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यात, मुख्यमंत्री शिंदे, “आपल्याला काय? बोलायचे अन् निघून जायचं, बोलून मोकळे व्हायचे’ असे म्हणाले. त्यावर अजित पवार हो असे… तर माईक चालू आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
आता याच व्हिडिओ वरून शिंदेंना प्रचंड ट्रोल केले जात आहे. तसेच विरोधकांकडून देखील त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी आंतरवाली येथील दौरा रद्द केल्याची माहिती आता समोर येत आहे. त्यामुळे आधीच अंदोलकांवर लाठीमाराचा आदेश देऊन मराठा समाजाचा रोष ओढावून घेतलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकाचे पाय या व्हिडीओमुळे आणखी खोलात गेले आहेत.
त्यांना वेळ हवा होता मी दिला! -जरांगे
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या संभाषणाचा वादग्रस्त व्हिडिओ खरा असेल, तर त्यांना ते खूप महागात पडेल,’ असा इशारा मराठा आरक्षणासाठी गत 16 दिवसांपासून उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
“मी उपोषणाची जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांना भेटण्यासाठी वेळ हवा होता. तो मी दिला,’ असेही ते यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या आंतरवाली जालना दौऱ्यावर भाष्य करताना ते म्हणाले.