नवी दिल्ली – तांत्रिक बिघाडामुळे रशियातल्या मगदान येथे इमर्जन्सी लॅन्डिंग करावे लागलेले एअर इंडियाचे विमान आज सॅन फ्रान्सिस्कोला रवाना झाले. मूळ प्रवासातील सर्व 233 प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना घेऊन हे विमान आपल्या मूळ प्रवासासाठी सॅन फ्रान्सिस्कोला रवाना झाले, असे एअर इंडियाच्यावतीने आज सांगण्यात आले.
इंजिनमधील बिघाडामुळे दिल्लीहून ए आय- 173 हे विमान मंगळवारी रशियातील मगदान येथे वळवण्यात आले होते. या विमानात 216 प्रवासी आणि 16 कर्मचारी तेथे सुखरूप उतरले होते. या प्रवाशांच्या सुविधेसाठी एअर इंडियाने एक फेरी विमान मगदान येथे पाठवले होते.
नादुरुस्त विमानाच्या दुरुस्तीसाठी तंत्रज्ञदेखील रवाना करण्यात आले होते. आज सकाळी साडेदहा वाजता हे विमान सॅन फ्रान्सिस्कोकडे रवाना झाले, असे एअर इंडियाने प्रसिद्धीस दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.
सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आगमन झाल्यानंतर सर्व प्रवाशांसाठी क्लिअरन्सची औपचारिकता पार पाडण्यासाठी एअर इंडियाच्यावतीने सॅन फ्रान्सिस्को येथे अतिरिक्त ऑन-ग्राउंड मदत कक्ष उभा करण्यात आला आहे. वैद्यकीय सहाय्य वगळता वाहतूक, स्थानिक कनेक्टिव्हीटी आणि संबंधित सेवांचा त्यामध्ये समावेश असणार आहे, असे एअर इंडियाच्या वतीने सांगण्यात आले.