नगर (प्रतिनिधी) – देशातील महामारी रोखण्यात कोविड सेंटरची खूप मदत होत आहे. कोणतीही शासकीय मदत नसताना बुथसारखी हॉस्पीटल ही सेवा करत आहेत. त्यामुळे यावर्षीचा बाप्पा अत्यंत साधेपणाने साजरा करुन सार्वजनिक गणेश मंडळांनी कोविड सेंटरला मदत करायला हवी, असे विचार अशोक बलदोटा यांनी व्यक्त केले.
नगर क्लब येथील बॅडमिंटन ग्रुपतर्फे बुथ हॉस्पीटलला एक लाख रुपयांचे वैद्यकीय साहित्य भेट देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. बलदोटा यांच्यासह डॉ. रवींद्र सोमाणी, डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. मोहन थोलर यांच्या मदतीतून हे साहित्य भेट देण्यात आले. बुथ हॉस्पीटलचे व्यवस्थापक देवदान कळकुंबे यांच्याकडे ही भेट सुपूर्द करण्यात आली.
यावर्षी गणेशोत्सव अत्यंत सध्या पद्धतीने साजरा होत आहे. त्यामुळे वाचलेला खर्च सार्वजनिक मंडळांनी सेवाभावी काम करणाऱ्या बुथ हॉस्पिटलला किंवा शहरातील अन्य कोणत्याही कोविड उपचार सेंटरला मदत स्वरुपात द्यावी. पोलीस, डॉक्टर, हॉस्पिटलचे अन्य कर्मचारी, केमिस्ट आदी करोना योद्धे जीवावर उदार होवून सेवाकार्य करत आहेत. त्यांना मदत व्हायलाच हवी, असेही बलदोटा म्हणाले.
डॉ. कांकरिया म्हणाले, “”बुथ हॉस्पीटलला मदतीची गरज आहे हे कळल्यावर काही मिनिटांत सर्वच सदस्यांनी मदत जमा केली. बुथ हॉस्पिटल करोना रुग्णांसाठी मोठाच आधार असलेले हॉस्पिटल झाले आहे. हे करोनाचे संकट दूर होण्यासठी सुरु असलेल्या सेवा यज्ञात सर्वांनी आपली मदतरुपी आहूती टाकावी.”