प्रा. श्रीकांत बेडेकर; सद्भावना सप्ताहानिमित्त कॉंग्रेस पक्षाचा शहरात परिसंवाद
नगर (प्रतिनिधी) – नगर शहर कॉंग्रेसला आजपर्यंतचा सर्वात तरुण शहर-जिल्हाध्यक्ष मिळाला. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाला नगर शहरात पुन्हा नवसंजीवनी मिळेल असा, असे विचार कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. श्रीकांत बेडेकर यांनी व्यक्त केले.
कॉंग्रेस पक्षाच्या वतीने स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सद्भावना सप्ताहात ते बोलत होते. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, नगर शहर-जिल्हाध्यक्ष किरण काळे, माजी नगरसेवक दीप चव्हाण, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष अज्जूभाई शेख, महिला कॉंग्रेसच्या नलिनी गायकवाड, जरीना पठाण, रजनी ताठे, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष मयूर पाटोळे, विद्यार्थी कॉंग्रेसचे अध्यक्ष दानिश शेख, सेवादल कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष डॉ. अमोल लोंढे, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष सुरेश झावरे, प्रशांत वाघ, चंद्रकांत उजागरे आदींसह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
प्रा. बेडेकर म्हणाले, “”शहरामध्ये कॉंग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत संघटनात्मक कामाला मरगळ आल्याने कार्यकर्ते विखुरले होते. परंतु शहरातील कॉंग्रेस पक्षाचा मतदार कॉंग्रेस विचारधारे सोबत आजही कायम आहे.”जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफरे म्हणाले, “” पक्षाने देशात विकासाची मुहूर्तमेढ रोवत तळागाळातील सर्वसामान्य घटकाला बळ देण्याचं काम केलं.” शहर-जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी प्रास्तविक केले. नलिनी गायकवाड यांनी आभार मानले.