पुणे – महापालिकेच्या करोना संक्रमित झालेल्या मात्र घरीच उपचार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही 14 दिवसांची उपचाराची विशेष रजा लागू होणार आहे. करोना नियंत्रणाच्या कामात बाधित झालेल्या आणि हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठीच ही रजा मंजूर करण्याचे आदेश यापूर्वी काढले होते. त्यामुळे अनेक कर्मचारी घरीच विलग झाल्यानंतर त्यांना या विशेष रजेचा लाभ मिळालेला नव्हता. त्यामुळे प्रशासनाने स्वतंत्र आदेश काढून घरीच उपचार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे.
महापालिकेकडून करोना कालावधीत अहोरात्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात, कर्मचाऱ्यांना 100 टक्के मोफत उपचार, करोनाबाधित झाल्यानंतर 14 दिवसांची विशेष रजा अशा निर्णयाचा समावेश आहे. मात्र, पहिले आदेश काढताना केवळ रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच याचा लाभ देण्यात येत होता, तर जे कर्मचारी बाधित आहेत.
मात्र, त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. त्यांना विशेष रजा न देता त्यांच्या नियमित सुट्टीमधून या रजा वगळण्यात येत होत्या. ही बाब कर्मचाऱ्यांकडून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सुधारित आदेश काढून त्यात बदल केला आहे.