नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर दक्षिणेचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. २२ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी दिली.
आगरकर यांनी सांगितले की, २२ एप्रिल रोजी डॉ. सुजय विखे पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालय येथे ११ वाजता आपला अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
त्याचबरोबर आमदार मोनिका राजळे, आमदार प्रा. राम शिंदे, जिल्हा बॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले, आमदार बबनराव पाचपुते, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार चंद्रशेखर कदम, माजी आमदार चंद्रशेखर घुले, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहटा, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बाबुशेठ टायरवाले, अनिल शिंदे यांच्यासह सर्व मित्र पक्षाचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
साधेपणा पुन्हा चर्चेत; स्टेजवर बसण्यासाठी खुर्ची नाही, निलेश लंके थेट खालीच बसले
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरवणुकीला सुरुवात होणार आहेत. माळीवाडा वेस येथून विशाल गणपतीचे दर्शन घेत, पंचपीर चावडी मार्गे माणिक चौक, भिंगारवाला चौक, तेलीखुंट, चितळे रोड, स्वा. वीर सावरकर चौक, दिल्लीगेट ते निलक्रांती चौक येथे मिरवणुकीची सांगता होईल. यावेळी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी आणि सत्कार केला जाणार आहे. यावेळी भाजप, महायुती आणि घटक पक्ष, मित्रपक्षांचे हजारो कार्यकर्ते यावेळी हजर राहणार असल्याचे आगरकर यांनी सांगितले.