नगर – विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडे 4 हजार 456 मतदारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक 705 अर्जांचा यामध्ये समावेश आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे विद्यमान आमदार किशोर दराडे यांती मुदत संपत असल्याने निवडणूक आयोगाने नव्याने मतदारनोंदणी कार्यक्रम जाहीर केला. मतदार नोंदणीसाठी दि. 30 सप्टेंबरपासून प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत 4 हजार 456 शिक्षकांचे मतदार नोंदणीसाठी अर्ज दाखल झाले आहेत. श्रीगोंदे तालुक्यातून आतापर्यंत फक्त 112 अर्ज दाखल झाले आहेत.
येत्या दि. 6 नोव्हेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. उपलब्ध अर्जांची निवडणूक विभागाच्या वतीने तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर पात्र अर्जांची मतदार यादीत नोंद होणार आहे. त्यानंतर दि. 23 नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. या यादीवर दि.9 डिसेंबर 2023 पर्यंत दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. उपलब्ध दावे आणि हरकती निकाली काढून 25 डिसेंबरपर्यंत पुरवणी यादी तयार केली जाणार आहे. त्यानंतर 30 डिसेबर 2023 रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे.