नगर – ऑक्टोबर हिटमुळे वाढलेले तापमान व बदलत्या हवामामुळे जिल्ह्यामध्ये साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. नगर महापालिका क्षेत्रात तर डेंग्यू सदृष्य आजाराने कहर केला आहे. गेल्या काही महिन्यात रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. महापालिकेकडे गेले दोन महिन्यात 43 डेंग्यू रुग्णांची नोंद झाली असून, प्रत्यक्षात डेंग्यू सदृष्य आजारावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ही 590 च्या वर गेल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, डेंग्यू सदृष्य आजाराने आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोणतेही उपाययोजन होत नसल्याने सध्या नगरकरांचे आरोग्य रामभरोसे आहे.
शहरातील केडगाव, सारसनगर, मध्यवर्ती शहरासह इतरही भागात डेंग्यू व डेंग्यू सदृष्य आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येत आढळत आहेत. डेंग्यू सदृश आजाराने शहरामध्ये थैमान घातले आहे. त्यामुळे शहरातील शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयातही रुग्ण वाढले आहेत. विशेषतः केडगाव उपनगरात ही डेंग्यू चे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आहे. तेथील खासगी डॉक्टरांकडे रुग्ण संख्या वाढली आहे. पंधरा दिवसांपूर्वी नगर शहरात डेंग्यूचे 32 रुग्ण असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. आता पंधरा दिवसात ही संख्या 43 झाली आहे. म्हणजे 11 रुग्ण वाढले आहे. अर्थात डेंग्यू सदृष्य आजाराचे रुग्ण सध्या 190 असून आतापर्यंत 590 रुग्णांवर उपचार झाले आहेत.
डेंग्यूसदृश्य रुग्णांमध्ये प्लेटलेट कमी होत आहेत. यामुळे ब्लडबॅंकमध्येही प्लेटलेट्सची मागणी वाढली आहे. डेंग्यू या आजाराला कारणीभूत ठरणाऱ्या एडिस इजिप्ती डासाच्या वाढीसाठी सध्या पोषक वातावरण आहे. त्यामुळे रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महापालिकेकडून आवश्यक त्या उपाययोजना होण्याची गरज आहे. केडगाव उपगनरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने या परिसरात तातडीने फवारणी करणे आवश्यक आहे. मात्र महापालिकेकडून दुर्लक्ष होत आहे. अर्थात महापालिकेत आरोग्य विभाग आहे की नाही अशी शंका व्यक्त होत आहे. शहरात डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण वाढत असतांना आरोग्य विभाग काय करते असा प्रश्न आहे.
आतापर्यंत 4 ते पाच हजार रक्तनमुने घेण्यात आले असून घरोघर सर्व्हेक्षण देखील सुरू आहे. त्याबरोबर दर आठवड्याला धुर फवारणी, पंधरा दिवसाला फॉगिंग देखील करण्यात येत आहे. गेल्या महिन्यात खास फवारणी व फॉगिंग करण्यासाठी 50 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या 590 डेंग्यू सदृश्य रुग्ण आहेत. त्यापैकी 43 रुग्ण खऱ्या अर्थाने सापडले आहे. त्यात मृत्यू झाला असला तरी अहवाल आल्याशिवाय तो जाहिर करता येत नाही. तरी नगरकरांनी महापालिकेने केलेल्या सुचनाचे पालन करावे.
डॉ. अनिल बोरगे
वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका