मुंबई – नियम व अटी डावलून कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मर्जीतील दोन कंपन्यांच्या घशात तब्बल 150 कोटी रुपयांचे कंत्राट घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ठाकरे गटाचे मुखपत्रातून हा आरोप करण्यात आला आहे. या आरोपामुळे खासगी सचिवाच्या खंडणीप्रकरणामुळे आधीच गोत्यात आलेल्या अब्दुल सत्तार यांच्या अडचणींत आणखी वाढ झाली आहे.
महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडून ऑर्गेनिक कीटकनाशक खरेदीसाठी 150 कोटींचे टेंडर काढण्यात आले होते. मात्र, निविदेतील अटी, शर्ती बासनात गुंडाळून सत्तार यांच्या मर्जीतील कंपन्यांना हे कंत्राट दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. रासायनिक कीटकनाशकाचा वापर कमी व्हावा, या उद्देशाने राज्य व केंद्र सरकारच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मोफत नीमबेस अर्थात ऑर्गेनिक कीटकनाशक देण्यात येते. या कीटकनाशकांची खरेदी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळामार्फत करण्यात येते. यासाठी कृषी उद्योग विकास महामंडळामार्फत निविदा काढल्या जातात.
विशेष म्हणजे ऑर्गेनिक कीटनकाशक खरेदीसाठी कंत्राट मिळालेल्या के.बी. बायो-ऑगनिक आणि न्यूएज ऑग्रि. इनोव्हेशन या दोन्ही कंपन्यांचे संचालक एकच आहे. सचिन यादव असे त्यांचे नाव आहे. तसेच, या दोन्ही कंपन्या ठाण्यातील असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कंपन्यांकडून व महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडून शेतकऱ्यांना मोफत ऑर्गेनिक कीटकनाशके दिली जाणार असली तरी त्याचा फायदा मात्र कंपन्यांना व मंत्र्यांनाच होणार असल्याची चर्चा असल्याचा दावा ठाकरे गटाच्या मुखपत्रात करण्यात आला आहे.
13 पैकी 9 कंपन्या बाद
निविदेबाबत सांगण्यात आले आहे की, महामंडळाने झिंक सल्फेट (हेप्टा हायड्रेट) झेन-21टक्के, फेरस सल्फेट (एफई-19टक्के), कॉपर सल्फेट (सीयू-24 टक्के), मॅगनीज सल्फेट (एमएन-30.5 टक्के), मॅग्नेशियम सल्फेट (एमजी-9.6टक्के), बोरॉन – 10.5 टक्के, सल्फर 90 टक्के (ग्रॅन्युल) सुक्ष्म पोषक ग्रेड-1 (माती वापरासाठी) मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-2 (फोलियर ऑप्लिकेशनसाठी) व सूक्ष्म पोषक ग्रेड-3 (माती वापरासाठी – आम्ल माती) खरेदीसाठी निविदा काढली होती. यासाठी 11 कंपन्यांनी निविदा भरल्या. मात्र निकषात बसत नसल्याचे कारण पुढे करून तब्बल 9 कंपन्या बाद करण्यात आल्या. त्यानंतर शिल्लक राहिलेल्या के. बी. बायो ऑर्गनिक आणि न्यू एज ऑग्रि. इनोव्हेशन या दोन कंपन्यांचे तांत्रिक आणि आर्थिक बिड न तपासताच त्यांच्या निविदा पात्र ठरविण्यात आल्या.