मुंबई – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल करण्याची धमकी देऊन पाच कोटीची खंडणी मागणाऱ्या रेणू शर्माला पोलिसांनी अटक केली आहे. इंदूर येथून शर्माला अटक करण्यात आली आहे.
शर्माकडून मिळालेल्या धमकीनंतर मुंडे यांनी मुंबई क्राईम ब्रॅंचमध्ये धाव घेत पुराव्यांसह तक्रार दिली होती. त्यानुसार संबंधित महिलेविरोधात मलबार हील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. गेल्या दीड-दोन वर्षांपासून संबंधित महिला त्रास देत असल्याचे त्यांनी तक्रारीत सांगितले आहे.
दरम्यान, या संबंधित प्रकणावर धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलतांना म्हणाले, माझ्यावर गेल्या वर्षभरात अशा खोट्या तक्रारकरण्यात आल्या. ज्या गोष्टी मागच्या दिड-दोन वर्षामध्ये झाल्या. त्या मी सहन करत होतो. मात्र सगळ्या गोष्टी आता सहनशक्तीच्या बाहेर गेल्यानंतर शेवटी मला पोलिसांमध्ये तक्रार द्यावी लागली. पोलिसांना मी सगळे पुरावे दिलेले आहेत.” असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, तथाकथित रेणू शर्मा या महिलेने मागील वर्षी जानेवारीत धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्कार केल्याचा आरोप करत खळबळ माजवली होती, त्यानंतर काही दिवसातच तिने सदर तक्रार माघारी घेतली होती. तेव्हापासून रेणू शर्मा ही परदेशातील नंबर वापरून मेसेज, व्हॉट्स अॅप तसेच फोन करून पैशांची मागणी करत होती, यासंदर्भातील सर्व पुरावे पोलिसात दिले असल्याचेही धनंजय मुंडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.