मुंबई : आयएनएस विक्रांत बचाव मोहिमेत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी कोट्यवधींचा अपहार केल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर सोमय्या पिता-पुत्रांना या प्रकरणी अटक करण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. मात्र आता किरीट सोमय्या यांच्याप्रमाणेच मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचे पुत्र नील सोमय्या यांनाही अटकेपासून अंतरिम दिलासा दिला आहे.
येत्या 28 एप्रिलला होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत सोमय्या पितापुत्रांना अटक न करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. यादरम्यान त्यांना अटक झाल्यास नील सोमय्या यांचीही 50 हजारांच्या वैयक्तिक जामीनावर त्यांची सुटका करण्याचे निर्देशही मुंबई उच्च न्यायालयाने जारी केले आहेत.
दरम्यान, 25 ते 28 एप्रिल असे सलग चार दिवस सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत त्यांना चौकशीकरता आर्थिक गुन्हे अन्वेषण कार्यालयात हजेरी लावणे नील सोमय्यांसाठी बंधनकारक राहील असे निर्देश न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांनी आपल्या निकालात दिले आहेत. सन 2013 मधील प्रकरणी वर्ष 2022 पर्यंत कोणतीच तक्रार नव्हती. तसेच या मदतनिधीतून जो 57 कोटींचा अपहार झाल्याचा आरोप करण्यात येतोय, त्याचे कोणतेही पुरावे सध्या उपलब्ध नाहीत या गोष्टी केवळ माध्यमांतील बातम्यांवर अवलंबून आहेत.
त्यामुळे हा तपासाचा मुद्दा आहे हे मान्य करत आम्ही आरोपीला तपासाकरता हजर राहण्याचे निर्देश जारी करत आहोत असे मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या निकालांत स्पष्ट केले आहे. आपण पोलिसांना याप्रकरणी तपासांत पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत अशी भूमिका नील सोमय्यांच्यावतीने ऋषिकेश मुंदरगी यांनी मुंबई उच्च न्यायालयात मांडली. तर राज्य सरकारच्यावतीनं विशेष सरकारी वकील शिरीष गुप्ते यांनी याचिकेला विरोध केला नाही.