अनेकदा आपल्या ट्विटद्वारे आम आदमी पार्टीला लक्ष्य करणारे कुमार विश्वास यांच्या घरी आज सकाळी पंजाब पोलीस पोहोचले आहे. याची माहिती कुमार यांनी स्वतः ट्विट करून दिली आहे आणि काही फोटोही शेअर केले आहेत. पंजाब पोलीस बुधवारी म्हणजेच आज सकाळी कवी आपचे बंडखोर नेते डॉ. कुमार विश्वास यांच्या घरी कारवाईसाठी पोहोचले.
पंजाब पोलीस कारवाईसाठी कुमार यांच्या घरी दाखल झाल्यानंतर त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री व आप नेते अरवींद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे नाव न घेता त्यांना इशारा दिला आहे.
सुबह-सुबह पंजाब पुलिस द्वार पर पधारी है।एक समय, मेरे द्वारा ही पार्टी में शामिल कराए गए @BhagwantMann को आगाह कर रहा हूँ कि तुम, दिल्ली में बैठे जिस आदमी को, पंजाब के लोगों की दी हुई ताक़त से खेलने दे रहे हो वो एक दिन तुम्हें व पंजाब को भी धोखा देगा।देश मेरी चेतावनी याद रखे🙏🇮🇳 pic.twitter.com/yDymGxL1gi
— Dr Kumar Vishvas (@DrKumarVishwas) April 20, 2022
कुमार विश्वास यांनी ट्विट करून लिहिले की, “पहाटे पंजाब पोलीस दारात आले. एकेकाळी माझ्या सांगण्यावरून पार्टीमध्ये सामावून घेतलेल्या भगवंत मान यांना सावध करत आहे की, दिल्लीत बसून ज्यांना तुम्ही पंजाबच्या जनतेने दिलेल्या सत्तेशी खेळू देत आहात, एक दिवस ते तुमची आणि पंजाबची फसवणूक करणार. देश माझा इशारा लक्षात ठेवेल. अशा इशारा कुमार विश्वास यांनी दिला आहे.
पंजाबमधील निवडणुकीदरम्यान कुमार विश्वास यांनी आप आणि पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. केजरीवाल यांनी देश तोडण्याचा प्रयत्न केल्याचे ते म्हणाले होते. याबाबत त्यांनी केजरीवाल यांच्याकडे उत्तरही मागितले होते. केजरीवाल यांना फुटीरतावाद्यांच्या पाठिंब्याने सरकार बनवायचे होते, असे कुमार म्हणाले होते.
मोहाली क्राईम सेलमध्ये करण्यात येत आहेत गुन्हे दाखल
केजरीवाल आणि आप यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल पंजाब पोलिसांकडून मोहालीतील सायबर क्राइम सेलमध्ये गुन्हे दाखल केले जात आहेत. आतापर्यंत भाजप नेते तेजिंदर बग्गा, नवीन कुमार जिंदाल आणि प्रीती गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, कुमार यांच्यावर कोणता गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.