BCCI & CAN : एक दशकापासून अफगाणिस्तान क्रिकेटला सतत मदत केल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) क्रिकेट असोसिएशन ऑफ नेपाळला (CAN) मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात पुढील महिन्याच्या अखेरीस T20 त्रिकोणी मालिका आयोजित केली जाईल. यामध्ये नेपाळचा सामना बडोदा आणि गुजरातशी होणार आहे.
वास्तविक, अलीकडेच सीएएन (CAN)चे अध्यक्ष चतुर बहादूर यांनी बीसीसीआय सचिव जय शाह यांची दिल्लीत भेट घेतली होती. यादरम्यान, नेपाळच्या प्रतिभावान खेळाडूंना पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षणाशी संबंधित मदत देण्याची मागणी त्यांनी बीसीसीआयकडे केली होती. सोमवारी बीसीसीआयने याला सहमती दर्शवली आणि टी-20 त्रिकोणी मालिकेची घोषणा केली.
31 मार्चपासून होणार स्पर्धेला सुरुवात…
ही स्पर्धा 31 मार्चपासून सुरू होणार असून, त्यात सात सामने खेळवले जाणार आहेत. 7 एप्रिल रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यापूर्वी सर्व संघ इतर संघांविरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळतील. नेपाळ संघ बडोदा आणि वापी येथे गुजरातचा सामना करेल. यामुळे नेपाळ संघाची अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या T20 विश्वचषकासाठीची तयारी यानिमित्ताने होईल.
‘सीएएन’ने तीन क्षेत्रात मागितली होती मदत..
क्रिकेट असोसिएशन ऑफ नेपाळ (CAN) ने टी20 विश्वचषकापूर्वी नेपाळच्या राष्ट्रीय संघाला कोणत्याही व्यत्ययाशिवाय सराव सामने खेळण्याची संधी द्यावी, अशी मागणी केली होती. वास्तविक काठमांडूचे हवामान खेळांना अनुकूल नाही. दुसरीकडे, नेपाळमधील खेळाडूंना योग्य वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत तर भारतीय खेळाडूंना बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये उत्तम व्यवस्था उपलब्ध आहे. त्याचवेळी बोर्डाची तिसरी मागणी होती की नेपाळच्या अंडर-19 आणि अ संघांना विविध राज्यांतील संघांसोबत खेळण्याची संधी मिळावी. यामुळे त्यांच्या खेळाडूंचा विकास होण्यास तसेच त्यांचे कौशल्य वाढण्यास मदत होईल.