पुणे -महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या (डी.एल.एड.) केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उमेदवारांना ऑनलाइन नोंदणीसाठी 13 जूनपासून सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असून 27 जूनपर्यंत ही सुविधा चालू राहणार आहे.
ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेबाबत सूचनांचे काटेकोटपणे पालन करुन कार्यक्षेत्रातील सर्व अध्यापक विद्यालयांना सविस्तर सूचना देण्याबाबतचे आदेश विद्या प्राधिकरणाचे संचालक शरद गोसावी यांनी राज्यातील सर्व जिल्हा शिक्षणव प्रशिक्षण संस्थांच्या (डायट) प्राचार्यांना दिले आहेत. उमेदवारांनी पूर्ण भरलेल्या अर्जांची डायट स्तरावरुन 13 ते 28 जून या कालावधीत ऑनलाइन पडताळणी करण्यात येणार आहे. 3 जुलै रोजी प्राथमिक गुणवत्ता जाहीर करुन त्यावरील आक्षेपाचे निरसन करण्यात येणार आहे. 5 जुलै रोजी पूर्ण भरलेल्या अर्जांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. 6 जुलै रोजी प्रथम प्रवेश फेरीची यादी जाहीर होईल. प्रथम फेरीतील उमेदवारांना प्रवेशासाठी 6 ते 10 जुलै, असा कालावधी देण्यात येणार आहे. या फेरीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची यादी डायट लॉगिनवर 10 जुलै रोजी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी 11 जुलै रोजी विकल्प देता येतील. 13 जुलै रोजी या फेरीची यादी जाहीर होईल. 13 ते 17 जुलै या कालावधीत या फेरीतील उमेदवारांना प्रवेश घेता येतील. 17 जुलै रोजी प्रवेश घेतलेल्या उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. तिसऱ्या फेरीसाठी 18 जुलै रोजी विकल्प नोंदविता येणार आहेत. तिसऱ्या व अंतिम प्रवेश फेरीची यादी 20 जुलै रोजी जाहीर होणार आहे. या फेरीतील उमेदवारांना प्रवेश घेण्यासाठी 20 ते 24 जुलै उमेदवारांना प्रवेश घेता येतील.