नवी दिल्ली : जगातल्या प्रत्येक पालकाची मनापासून इच्छा असते कि, आपल्या मुलीला किंवा मुलाला हवा तो नवरा मिळावा, तिला सुखी राहता येईल असे घर मिळावे. मात्र सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्याच लग्नाची जोरात चर्चा सुरु झाली आहे. एका मुलीने आपल्या 50 वर्षांच्या आईच्या सुखासाठी तिचे लग्न लावून दिले आहे
मेघालयातील शिलाँग येथे राहणारी देबर्ती चक्रवर्ती हिने तिच्या आईचं दुसरं लग्न लावलं आहे, कारण वडिलांच्या निधनानंतर आई बराच काळ एकटीच आयुष्य जगत होती. अशा परिस्थितीत देबर्तीने मोठ्या कष्टाने आईला लग्नासाठी तयार केले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार देबर्तीने सांगितले की, जेव्हा ती फक्त 2 वर्षांची होती, तेव्हा तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता आणि तिची आई 25 वर्षांची होती. ते व्यवसायाने डॉक्टर होते. वडिलांच्या निधनानंतर देबर्ती तिच्या आईसोबत तिच्या आजीच्या घरी राहत होती.
देबर्तीच्या म्हणण्यानुसार, तिने आईला अनेकवेळा सांगितले, तसेच तिने स्वत:साठी जीवनसाथी शोधायला हवा, असे समजावून सांगितले, परंतु तिला आता या वयात जीवनसाथी मिळणार नाही असे सांगून आईने नकार दिला. मग शेवटी ती वेळ आलीच, जेव्हा देबर्तीने आईला खूप समजावून सांगितल्यानंतर दुसऱ्या लग्नासाठी तयार झाली. रिपोर्ट्सनुसार, याच वर्षी देबर्तीच्या आईचे पश्चिम बंगालमधील रहिवासी स्वपनसोबत लग्न झाले. आता देबर्ती म्हणते की, तिची आई लग्न करून खूप आनंदी आहे