मुख्यमंत्री आणि वडील माझे पद ठरवतील – आदित्य ठाकरे

मुंबई – भाजप-शिवसेना युती पुन्हा सत्तेत आल्यास युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री बनवले जाईल, अशी जोरदार चर्चा आहे. त्यापार्श्‍वभूमीवर, वडील (उद्धव ठाकरे) आणि मुख्यमंत्री माझे पद ठरवतील, अशी भूमिका आदित्य यांनी मांडली. जे नशीबात लिहिलेले असते; ते जनता देते, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

येथे इंडिया टुडेने आयोजित केलेल्या प्रश्‍नोत्तराच्या कार्यक्रमात आदित्य बोलत होते. स्वत: विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, या प्रश्‍नावर ते उत्तरले, जनतेची भावना विचारात घेऊन शिवसेना त्याविषयीचा निर्णय घेईल.

मी कुठल्याही जबाबदारीपासून पळ काढणार नाही. आमच्या पक्षाचे सर्व उमेदवार निवडून यावेत याबाबीला माझ्यादृष्टीने महत्व आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. राम मंदिराच्या मुद्‌द्‌यावर बोलताना आदित्य म्हणाले, अयोध्येतील जनतेची भावना आम्हाला समजली. मंदिराची उभारणी व्हावी अशी भाजप आणि शिवसेनेची समान इच्छा आहे. राम मंदिराचे श्रेय कुणाला मिळेल याची पर्वा आम्ही करत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.