“टिक टिक वाजते डोक्‍यात, धड धड वाढते ठोक्‍यात’

रोहन मुजूमदार
पुणे  – राजकीय हौसे-नवसे ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. तो क्षण आला अन्‌ शनिवारी (दि. 21) दुपारी निवडणूक आयोगाने आचारसंहिता जाहीर करून राज्यातील विधासभा निवडणुकीचा बिगुल वाजविला. निवडणुकीची तारीख जाहीर झाली तरी उमेदवारीबाबत शिक्‍कामोर्तब नसल्याने मातब्बरांसह इच्छुकांच्या “टिक टिक वाजते डोक्‍यात, धड धड वाढते ठोक्‍यात’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी कोणाची वर्णी लावणार अन्‌ कोणाला डावलणार, हे लवकरच जाहीर होणार असल्याने इच्छुकांसह मातब्बरांचे ठोके वाढले आहेत.

पुणे जिल्ह्यात (ग्रामीण भाग) बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर-हवेली, शिरूर-हवेली, खेड-आळंदी, आंबेगाव, जुन्नर, भोर-वेल्हे-मुळशी या नऊ मतदारसंघांचा समावेश आहे.

ही नऊही मतदारसंघ तशी सधन असून अनेक मतदारसंघात राजकीय पक्षांच्या चिन्हावर लढणाऱ्यांमध्ये मोठी रस्सीखेच असल्याने कोण “बंडखोरी’ करणार अन्‌ त्यामुळे कोणाला फटका बसणार याबालबतचे चित्र उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी स्पष्ट होईल मात्र, तोपर्यंत “बंडखोरी’ पीक जोमाने फुलणार यात कोणाचेही दुमत नाही.

जुन्नर : मतदारसंघात यंदा मोठी चुरस होणार आहे. कारण राज्यातून मनसेचा एकमेव आमदार या मतदारसंघातून निवडून आला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी घरवापसी करीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिक नाराज असून त्यांनी आवाज उठवल्याने आशा बुचके यांची हाकलपट्टीही करण्यात आली आहे. तर दुसरीकडे यंदा हा मतदरसंघ आघाडीत कॉंग्रेसकडे केल्याचे सांगण्यात आले होते.

मात्र, नंतर ते फोल ठरल्याचे सांगितले असले तरी शिवसेनेला तोड देण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीपैकी कोणीही उमेदवार उभा राहिल्यास अतुल बेनके (राष्ट्रवादी)-सत्यशील शेरकर (कॉंग्रेस) आम्ही एकदिलाने काम करू, असा संदेश मध्यंतरी दिला आहे. तर सध्या कुकडी कार्यालय नगरला नेण्यावरून येथील पाणीप्रश्‍न पेटला असल्याने सध्याचे भावनिक वातावरण आणि आशा बुचके यांची भूमिका हे आजी आमदारांपुढे मोठे आव्हान असणार आहे.

खेड-आळंदी : मतदारसंघाकडे लक्ष लागले असून इतर सर्व मतदासंघापेक्षा याठिकाणी सर्वाधिक इच्छुकांची फौज आहे. तरी ही सर्व फौज राष्ट्रवादीमध्येच आहे. युती झाल्यास भाजपने हा मतदारसंघ मागितला असला तरी विद्यमान आमदार शिवसेनाचा असल्याने भाजपकडे जाणे कठीण आहे. तरी भाजपचे इच्छुक बंडखोरी करून तिसरा पर्याय देणार का? अन्‌ राष्ट्रवादी माजी आमदारांवरच भरोसा दाखवणार की नवीन चेहऱ्याला संधी देणार, हे येणारा काळच ठरवेल.

आंबेगाव : मतदारसंघात कायम राष्ट्रवादी-शिवसेना असाचा सामना होतो. त्यात राष्ट्रवादीचे पारडे जड राहिले आहे. यंदा शिरूर लोकसभा मतदारसंघात परिवर्तन घडले आहे. त्यामुळे आंबेगाव विधानसभा मतदारसंघात यंदा परिवर्तन घडणार, असा विश्‍वास माजी खासदार शिवाजीराव आढळरावांनी घोषित केले असले तरी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांना तोडीस तोड उमेदवार देण्याचे शिवसेनेपुढे आव्हान राहणार आहे.

बारामती : हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा गड मानला जातो. येथे गेल्या सहा टर्मपासून अजित पवारच “दादा’ आहेत. त्यामुळे ते यंदा सातव्यांदा निवडून येणार का? तसा त्यांचा विजय सोपा असला तरी भाजपने तळागाळात आपले पाय पसरले असल्याने यंदा विजय त्यांना सोपा नसेल, अशी शक्‍यता असली तरी त्यांच्या विरोधात युती झाल्यास भाजप-शिवसेना की मित्रपक्षाचा उमेदवार उभा ठाकणार आणि तो कोण असणार? याबाबत उत्सुकता शिगेला
पोहोचली आहे.

दौंड : मतदारसंघात यंदा तिरंगी लढतीची अपक्षा आहे. हा मतदारसंघ परिवर्तन करण्यासाठी ओळखला जातो. यंदा राष्ट्रवादीकडून इच्छुकांची मांदियाळी जरी असली तरी राज्यात झालेली वाताहत पाहता रमेश थोरात यांच्याच गळ्यात माळ पडणार का? तर रासपचे आमदार राहुल कुल हे “कपबशी’ की “कमळ’च्या चिन्हावर निवडणूक लढवणार? अन्‌ त्यांनी जर “कमळ’च्या चिन्हावर निवडणूक लढवली तर रासप उमेदवार देणार का? अन्‌ राष्ट्रवादीतून कोणी बंडखोरी करणार का? हे पाहणे औत्सुक्‍याचे राहिल.

इंदापूर : मतदारसंघात आघाडी होत नसल्याचे पाहून दिग्गज नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. आमदार दत्तात्रय भरणे यांनी विकासकामे करून आपली प्रबळ दावेदारी सिद्ध केली असली तरी राष्ट्रवादीतील दुसऱ्या गटाने नुकतेच शक्‍तिप्रदर्शन केले असले तरी पक्षश्रेष्ठी जो आदेश देणार तो पाळणार, हा शब्द जरी दिला असला तरी येथे “बंडखोरी’ रोखण्याचे राष्ट्रवादीसमोर आव्हान असणार आहे.

पुरंदर – हवेली : मतदारसंघात पुन्हा शिवसेनाविरुद्ध कॉंग्रेस, अशीच लढत होण्याची अपक्षा असली तरी राष्ट्रवादी जागा सोडणार का? मनसे येथे उमेदवार उभा करून तिसरा पर्याय निर्माण करणार? याची उत्सुकता लागली आहे. तरी यंदा येथे गुंजवणीचे पाणी, पुरंदर विमानतळ, जलशिवार, गुंडगिरी आदी प्रश्‍नांनी आखाडा तापणार आहे.

शिरूर-हवेली : हा मतदारसंघ युती झाल्यास आपल्याकडे घेण्यासाठी शिवसेना आग्रही आहे, तर भाजप ही जागा सोडणार का? विद्यमान आमदार भाजपचा असल्याने शिवसेनेकडे ही जागा जाणे तसे कठीण आहे. तर राष्ट्रवादीत इच्छुकांची फौज असल्याने बंडखोरी होण्याची दाट शक्‍यता असल्याने राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भोर-वेल्हे-मुळशी : आघाडीत हा मतदारसंघ कॉंग्रेसकडे असून यंदा राष्ट्रवादीत इच्छुकांची गर्दी असल्याने ते आग्रही असले तरी कॉंग्रेसचे वर्चस्व पाहता ही जागा राष्ट्रवादीला सुटणे कठीण आहे. तर दुसरीकडे शिवसेनेमध्येही इच्छुकांची मांदियाळी असून गेल्या विधानसभेत त्यांनी कॉंग्रेसला घाम गाळण्यास भाग पाडल्याचे दाखवून दिले होते. त्यामुळे यंदा कॉंग्रेस हे आव्हान कसे पेलणार, हे स्पष्ट होणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×