नवी दिल्ली :- जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या अदिती गोपीचंद स्वामी हिने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या स्पर्धेत वैयक्तिक प्रकारात तिने सुवर्णपदकाला गवसणी घातली.
हे भारताचे वैयक्तिक तिरंदाजीतील पहिलेच सुवर्णपदक ठरले आहे. यामुळे अदिती तिरंदाजीतील भारताची सर्वात तरुण महिला विजेती बनली आहे. यापूर्वी भारताला या स्पर्धेत वैयक्तिक प्रकारात एकही सुवर्णपदक मिळालेले नाही.
सांघिक प्रकारात भारताला पहिल्याच दिवशी सुवर्णपदक मिळाले होते. त्यामुळे वैयक्तिक प्रकारासाठी सज्ज होताना अदितीवर कोणतेही दडपण नव्हते.
आता येत्या काळात अदितीला आंतरराष्ट्रीय तसेच जागतिक स्पर्धांमध्येही सहभागी व्हायचे आहे. तसेच तिला आता सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर पॅरिस ऑलिम्पिकपूर्वीच्या स्पर्धांमध्येही अव्वल मानांकन मिळवायचे आहे.