बेंगळुरू – “चांद्रयान-3’चे यशस्वी सॉफ्ट लॅंडिंग झाल्यानंतर लॅंडर “विक्रम’ही चंद्राच्या पृष्ठभागावर इच्छित ठिकाणी उत्तम प्रकारे उतरले आहे, अशी माहिती इस्रो अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी गुरुवारी दिली. तसेच रोव्हरची हालचाल आता होत असून ते खूप चांगले काम करत आहे. रोव्हरमध्ये दोन आणि लॅंडरवर तीन उपकरणे कार्यरत आहेत आणि ती सर्व क्रमशः चालू केली असल्याचे त्यांनी सांगितले.
पीटीआयशी बोलताना सोमनाथ म्हणाले, लॅंडर “विक्रम’ हे इच्छित ठिकाणी उत्तम प्रकारे उतरले. लॅंडिंगचे ठिकाण 4.5 किमी x 2.5 किमी असे चिन्हांकित केले होते. ते त्या पॉईंटच्या 300 मीटरच्या आत उतरले. याचा अर्थ ते लॅंडिंगसाठी ओळखल्या गेलेल्या क्षेत्रात कार्यरत आहे. तसेच सर्व क्रिया नियोजीत वेळापत्रकानुसार पार पडत असून यंत्रणा सामान्यपणे कार्यरत आहे.
इस्रोचे अध्यक्ष म्हणाले, आता पुढचे 14 दिवस महत्त्वाचे असणार आहेत. आपला सहा चाकी रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर फिरेल, वेगवेगळे प्रयोग केले जातील. चंद्रावरील एक दिवस हा पृथ्वीवरील 14 दिवसांच्या बरोबरीचा असतो. तिथे वेगवेगळी कामं करण्यासाठी, संशोधनासाठी लॅंडरबरोबर पाच पेलोड पाठवले आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाणी आणि खनिजे असण्याची शक्यता आहे. आपला रोव्हर त्यासंबंधीचे संशोधन करेल. या प्रमुख संशोधनासाठी आपण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान पाठवले आहे.
लॅंडर “विक्रम’ आणि रोव्हर “प्रज्ञान’ हे 14 दिवस काम करणार आहेत. कारण तोपर्यंत तिथे उन असणार आहे. मात्र, 14 दिवसांनी या ठिकाणी अंधार होईल आणि या दोन्हींचे काम थांबणार आहे. चंद्रावर जेव्हा परत सूर्य उगवेल, त्यावेळी या दोन्हीचे काम पुन्हा सुरु होऊ शकते.
रोव्हर त्याच्या गतिशीलतेच्या दरम्यान चंद्राच्या पृष्ठभागाचे रासायनिक विश्लेषण करेल. चंद्राच्या लॅंडिंग साइटच्या सभोवतालची माती आणि खडकांची मूलभूत रचना निर्धारित करण्यासाठी त्याच्या पेलोड्स (अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर) द्वारे चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करेल. रोव्हरवरील आणखी एक पेलोड, लेझर इंड्युस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप चंद्राच्या पृष्ठभागाची रासायनिक रचना आणि खनिज रचना काढेल.
तसेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा प्रदेश देखील शोधला जात आहे. कारण त्याभोवती कायमस्वरूपी सावली असलेल्या भागात पाणी असण्याची शक्यता आहे. रोव्हर हा सर्व डेटा लॅंडरला पाठवेल, जो तो पृथ्वीवर पाठवेल, असे इस्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.