बुडापेस्ट :- हंगेरीत सुरू असलेल्या जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या पुरुष रिले संघाने ऐतिहसिक कामगिरी केली आहे. पुरुषांच्या 4 बाय 400 रिले शर्यतीत भारतीय संघाने पहिल्यांदाच अंतिम फेरीत स्थान मिळवले.
महंमद अजमल, राजेश रमेश, अमोज जेकब आणि महंमद अनस याहिया यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने आशियाई स्तरावरील सर्वोत्तम वेळ नोंदवली. ही शर्यत या खेळाडूंनी अवघ्या 2 मिनिटे 59.05 सेकंदात पूर्ण केली. या शर्यतीत दुसरे स्थान मिळवलेला भारतीय संघ आगामी जागतिक स्पर्धेसाठीही पात्र ठरला आहे.
अमेरिका संघाने पहिले स्थान मिळवताना 2 मिनिटे 58.47 सेकंद अशी वेळ दिली. या शर्यतीसह भारताचा रिले संघ आशियातील सर्वोत्तम संघ ठरला आहे. यापूर्वी ही कामगिरी जपानच्या नावावर होती. त्यांनी यापूर्वीच्या स्पर्धेत 2 मिनिटे 59.51 सेकंदात शर्यत पूर्ण केली होती.
2020 सालच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने 3 मिनिटे 00.25 सेकंदांची वेळ दिली होती. त्या संघातही हेच खेळाडू होते. मात्र, त्यावेळी भारतीय संघाला अंतिम फेरी गाठता आलेली नव्हती.
या रिले शर्यतीत भारताच्या याहिया याने संघाला सुरुवात करून दिली. पहिल्या फेरीअखेर भारतीय संघ सहाव्या क्रमांकावर होता. त्यानंतर जेकबने अफलातून वेग वाढवताना संघाला दुसऱ्या स्थानावर आणले. यानंतर अजमल आणि रमेश यांनी अखेरच्या दोन टप्प्यांत संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला.