ऍड. ढाकणे, सरपंच संजय बडेंत शाब्दिक चकमक

येळी मतदान केंद्रात आल्याने घेतला आक्षेप ः मतदान प्रक्रिया शांततेत

पाथर्डी – लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान येळी गावात राष्ट्रवादीचे नेते ऍड. प्रताप ढाकणे व येळी गावचे सरपंच संजय बडे यांच्यात शाब्दिक चकमक वगळता तालुक्‍यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
येळी येथे किरकोळ कारणावरून ढाकणे व बडे यांच्यातील शाब्दिक चकमकीनंतर वातावरण तणावग्रस्त झाले होते. काही ग्रामस्थांनी दोघांनाही समजावून सांगत समजूतदारपणाची भूमिका घेत गावात चुकीचा पायंडा पडू नये, यासाठी प्रयत्न केले.

पोलिसांनी हस्तक्षेप करुन वातावरण पूर्ववत केले. तालुक्‍यातील 227 मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनेक मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रांत तांत्रिक बिघाड झाल्याने यंत्र बदलण्यासाठी प्रशासनाला चांगलीच धावपळ करावी लागली. शेवगाव व राहुरी हे निवडणूक विभागाचे प्रमुख केंद्र असल्याने मतदान यंत्रे पोहोच करण्यास काही ठिकाणी प्रशासनाला सुमारे दोन दोन तास वेळ लागला. पाथर्डी येथील तहसील कार्यालय जवळजवळ बंदच असल्याने मदत मिळू शकली नाही.

मतदान यंत्रांत बिघाड झालेल्या केंद्रांवर मतदानाची वेळ वाढवून दिल्याने उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती करंजी. शिरापूर, करडवाडी, डमाळवाडी, गितेवाडी, शिराळ, ढाकणवाडी, शहरातील शनिमंदिर व लोहसर, मोहोज खुर्द यासह इतरही काही मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रांत तांत्रिक बिघाड झाल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. सकाळी सात वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली. सकाळी उत्साही मतदान होण्याची अपेक्षा होती. मात्र मतदारांमध्ये फारसा उत्साह जाणवला नाही. दिवसभर वेळ मिळेल तसे मतदार घराबाहेर पडल्याने मतदान केंद्रांवर रांगा पाहायला मिळाल्या नाहीत.

दुपारी उन्हाच्या तीव्रतेने मतदार घराबाहेर न पडल्याने अनेक मतदान केंद्रे मतदार नसलेली पाहावयास मिळाली. दुपारनंतर ऊन उतरल्यानंतर पुन्हा मतदान प्रक्रियेला वेग आला. सकाळी साडेआठ वाजता आमदार मोनिका राजळे, मोहिनी राजळे व सरपंच मोनाली राजळे यांनी रांगेत उभे राहून कासार पिंपळगाव येथे मतदान केंद्रावर मतदान केले. संवेदनशील असणाऱ्या कासार पिंपळगाव व चितळी येथे मतदान केंद्रांबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले होते. केदारेश्‍वर कारखान्याचे अध्यक्ष ऍड. प्रताप ढाकणे यांनी सकाळी आठ वाजता अकोले येथे मतदान केले. त्यावेळी त्यांचे पुत्र हृषीकेश ढाकणे त्यांच्या सोबत होते. इंदिरानगर, कामत शिंगवे, राघुहिवरे येथील मतदान केंद्रांवर सायंकाळी गर्दी झाल्याने उशिरापर्यंत मतदान सुरू होते. मतदान केंद्रांवर पिण्यासाठी पाणी, अपंगांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली होती.

पोलीस प्रशासनाने कासार पिंपळगाव, चितळी, पाडळी, रूपेवाडी, कामत शिंगवे, अकोला, शहरातील उर्दू शाळा व नाथनगर शाळा येथील मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित केल्याने या मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तालुक्‍यात साडेतीनशे पोलीस, दहा पोलीस अधिकारी व केंद्रीय राखीव दल, सीआरपीएफ जवान यांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. येळी गावात मतदान केंद्रावर ऍड. प्रताप ढाकणे दुपारी गेले. तेथे गावचे सरपंच संजय बडे यांच्यात व ढाकणे यांच्यात शाब्दीक चकमक झाली. बडे यांनी ढाकणे यांच्या मतदान केंद्रात येण्यास हरकत घेतली. बडे यांचे समर्थक अधिक आक्रमक झाले. वातावरण तणावपूर्ण बनले. येळी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष महादेव जायभाये यांनी ऍड. ढाकणे यांना शांत राहण्याचा सल्ला दिला. पोलिसांनी हस्तक्षेप करुन ढाकणे यांना पोलीस बंदोबस्तात पोलीस वाहनातून गावाबाहेर पाठविले. संजय बडे यांच्या समर्थकांनी ढाकणे विरोधी घोषणा दिल्याचे समजते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.