#IPL2019 : चेन्नईचा हैदराबादवर दणदणीत विजय

चेन्नई – शेन वॉटसन आणि सुरेश रैना यांनी केलेल्या फटकेबाजीच्या बळावर चेन्नई सुपर किंग्जने सनरायजर्स हैदराबादचा सहा गडी राखून पराभव करत प्ले ऑफमधील आपला प्रवेश निश्‍चित केला आहे.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 20 षटकांत 3 बाद 175 धावांची मजल मारली. चेन्नईसमोर विजयासाठी 176 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात खेळताना चेन्नईने हे आव्हान 19.5 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात 176 धावा करत पूर्ण केले. 176 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नईची सुरुवात खराब झाली. सलामीवीर फाफ ड्यु प्लेसिस स्वस्तात परतल्यानंतर चाचपडत खेळणाऱ्या शेन वॉटसन आणि सुरेश रैना यांनी 7.3 षटकांमध्ये 77 धावांची भागीदारी करत चेन्नईच्या विजयाचा पाया रचला.

यावेळी रैनाने सावध तर वॉटसनने फटकेबाजी करत 35 चेंडूतच आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर वॉटसनने गेअर बदलत आणखीन वेगाने फलंदाजी करत 11.4 षटकांत चेन्नईचे शतक तर 16व्या षटकात दीडशतक फलकावर लावले. यावेळी वॉटसन आपले शतक पूर्ण करेल असे वाटत असताना तो 53 चेंडूत 96 धावा करुन परतला. वॉटसन परतल्यानंतर रायडू आणि केदार जाधव यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

तत्पूर्वी, खराब सुरुवातीनंतर मनिष पांडे आणि डेव्हिड वॉर्नर यांनी फटकेबाजी करत हैदराबादला पॉवरप्लेच्या 6 षटकांमध्ये 54 धावांची मजल मारून दिली. यावेळी पॉवर प्ले नंतर दोघांनी गेअर बदलून फटकेबाजीचा वेग वाढवला होता. त्यामुळे हैदराबादने 10 षटकांत 91 धावांची मजल मारली. यावेळी अकराव्या षटकांत मनिष पांडेने आपले अर्धशतक पूर्ण करत हैदराबादला शतकी मजल ओलांडून दिली. तर, त्या पुढच्याच षटकांत डेव्हिड वॉर्नरने अर्धशतक झळकावले. मात्र, 57 धावांवर खेळताना वॉर्नर बाद झाला.

यानंतर आलेल्या विजय शंकरच्या साथीत मनिष पांडेने संघाचा डाव सावरायला सुरुवात केली. मात्र, वॉर्नर बाद झाल्याने धावगती थोडी मंदावली होती. त्यामुळे 18व्या षटकांत हैदराबादने 150 धावांची मजल ओलांडली. यानंतर मोठा फटका मारण्याच्या नादात शंकर बाद झाला. मात्र, मनिष पांडेने हैदराबादला 175 धावांची मजल मारून दिली. यावेळी त्याने नाबाद 83 धावांची खेळी साकारली

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.