मुंबई – गौतम अदाणी संचलित अदाणी उद्योग समूह आता इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रात उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. गौतम अदाणी भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
पायाभूत सुविधा क्षेत्रात कार्यरत असलेल्या अदाणी समूहाने विमान वाहतूक क्षेत्रातही प्रवेश केला आहे. त्याचबरोबर पोलाद उत्पादन क्षेत्रात दक्षिण कोरियातील पोस्कोबरोबर प्रवेश केला आहे. आता या समूहाने इलेक्ट्रिक वाहन निर्मितीसाठी ट्रेडमार्क नोंदला असल्याचे दिसून येते. प्राप्त माहितीनुसार सुरुवातीला हा समूह व्यवसायिक इलेक्ट्रिक वाहने निर्माण करणार आहे.
या इलेक्ट्रिक वाहनाचा वापर या समूहातील पायाभूत सुविधा क्षेत्रात केला जाऊ शकतो. त्याचबरोबर हा समूह इलेक्ट्रिक वाहनासाठी बॅटरी आणि चार्जिंग स्टेशन क्षेत्रात ताकतीने उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
हा समूह हा हरित ऊर्जा क्षेत्रात सक्रिय असून या क्षेत्रातील कंपन्यांचे बाजारमूल्य तीन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. जगातील सर्वात मोठी अक्षय ऊर्जा कंपनी निर्माण करण्याचा कंपनीचा संकल्प आहे. त्यामध्ये हायड्रोजन निर्मिती प्रकल्पाचाही समावेश आहे. हरित ऊर्जा प्रकल्पात भारतातील रिलायन्स आणि टाटा समूहानेही बरीच गुंतवणूक केली आहे.