पुणे- बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून सहा कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना येरवडामधील शास्त्रीनगरमध्ये असलेल्या गल्ली क्रमांक आठमध्ये गुरुवारी (ता.3) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत तीन कामगार जखमी झाले आहेत. तर सुमारे दहा कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
स्लॅब कोसळल्याची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. स्लॅबचा ढिगारा आणि सळयांमध्ये अडकलेल्या कामगारांना पोलिस प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून बाहेर काढण्यात आले. काही कामगार या सळयांमध्ये अडकल्याने सळया कापून त्यांना बाहेर काढल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. शास्त्रीनगर चौकतील वाडिया बंगला गेट नंबर आठ येथील नवीन इमारतीचा स्लॅब भरण्याचे काम सुरु होते. काम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळला आहे. त्यामुळे ही दुर्घटना घडली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या चार ते सहा गाड्या घटनास्थळी पोहोचल्या व जवानांनी कामगारांना बाहेर काढण्याचे काम सुरु केले.
मृत्यू झालेल्या कामगारांचे मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात येत आहेत. तर जखमींवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. बांधकाम सुरू असताना कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली खबरदारी बांधकाम प्रकल्पावर घेण्यात आली होती की नाही याचा पोलिस तपास करत आहे. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर त्वरित पोलिस घटनास्थळी पोहोचले व बचावकार्य सुरू केले. या दुर्घटनेत सहा कामगारांचा मृत्यू झाला असून तिघे जखमी आहेत. जखमींवर उपचार सुरु आहे. स्लॅब नेमका कशामुळे कोसळला व कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली खबरदारी या ठिकाणी घेण्यात आली होती का नाही? याचा तपास सुरू आहे.
विजयसिंह चव्हाण, पोलिस निरीक्षक (गुन्हे) येरवडा पोलिस ठाणे