मुंबई – साउथ इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा लवकरच अभिनेता शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिचा हा चित्रपट पाहण्यासाठी चाहतेही आतुर झाले आहे. मात्र सध्या नयनतारा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. नयनताराने उत्तर चेन्नईमध्ये अगस्त्य चित्रपटगृहाची 53 वर्ष जुनी इमारत विकत घेतली आहे.
या थिएटरमध्ये शिवाजी गणेशन, रजनीकांत, कमल हासन, अजित कुमार आणि थलपथी विजय यांसारख्या तमिळ चित्रपट उद्योगातील अनेक सुपरस्टार्सचे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. अगस्त्य चित्रपटगृहची जुनी इमारत नयनताराची कंपनी ‘राउडी पिक्चर्स’अंतर्गत विकत घेतली आहे. अगस्त्य थिएटर हे देवी थिएटर ग्रुपचे होते आणि उत्तर चेन्नईमध्ये 1967 पासून कार्यरत होते.
कोरोना काळात 2020 मध्ये हे चित्रपटगृह बंद होते. त्यामुळे येथील स्क्रीनची दुरवस्था झाली आहे. याचे आता नयनतारा आणि तिचा पती विघ्नेश शिवन नूतनीकरण करणार आहेत. त्याचे दोन-स्क्रीन सुविधेत रूपांतर करण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे एकाच वेळी अनेक लोक स्क्रीनसवर बसू शकतात, असे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, नयनतारा अभिनेत्रीसह एक यशस्वी बिझनेसवुमन देखील आहे. तिने नेट्रिकॉन, गॉडफादर, इरू मुगन, गोल्ड अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. लवकरच ती ‘जवान’सह ‘लेडी सुपरस्टार 75’ आणि ‘द टेस्ट’ मध्ये देखील अभिनय करताना दिसणार आहे.
नयनताराचा पती विघ्नेश हा नावाजलेला दिग्दर्शक असून त्याने अनेक सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. लग्नानंतर चार महिन्यांनी या दोघांनी सरोगसीद्वारे जुळ्या मुलांना जन्म दिला. उयीर आणि उलगम अशी या जुळ्या मुलांची नावे आहेत.