इस्लामाबाद : पाकिस्तानमधील माजी मंत्री आणि इम्रान खान यांच्या निकटच्या सहकारी शिरीन मझारी यांची तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र “पीटीआय’ पक्षाचे 7 वरिष्ठ नेते आणि हजारो कार्यकर्ते मात्र 9 मे रोजी झालेल्या आंदोलनातील सहभागाच्या आरोपांखाली अजूनही कोठडीतच आहेत.
मझारी या इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळात 4 वर्षे मानवी हक्क मंत्री होत्या. हिंसक आंदोलनानंतर “पीटीआय’च्या पदाधिकाऱ्यांची धरपकड झाली असता त्यांना 21 मे रोजी त्यांच्या घरातूनच अटक करण्यात आली होती. मझारी यांच्या कन्या इमान मझारी यांनी या अटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
मझारी यांच्याविरोधात कोणतेही प्रकरण दाखल नसेल, तर त्यांची त्वरित सुटका करण्यात यावी, असे न्यायालयाने सांगितले. कोणत्याही हिंसक आंदोलनामध्ये सहभागी होणार नसल्याचे शपथपत्र मझारी यांनी सादर करण्याची सूचनाही न्यायालयाने केली. मात्र त्यांच्याविरोधात 7 प्रकरणे दाखल असल्यामुळे मझारी यांची सुटका होईल की नाही, हे स्पष्ट नाही.