South Movie – सुपरलेडी नयनतारा ही दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिला ‘लेडी सुपरस्टार’ म्हणतात. रजनीकांतची जशी क्रेझ आहे तशीच क्रेझ नयनतारासाठीही आहे, असेही म्हटले जाते. नयनताराने अॅटलीच्या ‘जवान’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने शाहरुख खानची पत्नी नर्मदाची भूमिका साकारली होती. मात्र, आता बातमी समोर येत आहे की, ‘जवान’च्या यशाचे श्रेय न मिळाल्याने नयनतारा संतापली आहे. ती फक्त साऊथ इंडस्ट्रीतच काम करणार असून आता कुठलाही हिंदी चित्रपट करणार नसल्याचेही बोलले जात आहे.
वृत्तानुसार, ‘जवान’ हा चित्रपट शाहरुख खान आणि नयनताराचा चित्रपट असणार होता, मात्र याचे सर्वाधिक श्रेय शाहरुख आणि शाहरुख-दीपिकाला दिले जात आहे. यामुळे नयनताराचे चाहते किंवा नयनतारा स्वतः खुश नाहीत. नयनताराला ऑफर करण्यात आलेली भूमिका लहान करण्यात आल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. दीपिकाचा ‘जवान’ चित्रपटात कॅमिओ होता.
रिपोर्ट्सनुसार, नयनताराने आता ठरवले आहे की ती फक्त साऊथ इंडस्ट्रीत काम करणार आहे. आता ती बॉलिवूडचा कोणताही चित्रपट करणार नाही. दरम्यान, नयनताराच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास, आगामी ‘इरायवन’ या तमिळ चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमासाठी नयनताराने 10 कोटी रुपये फी घेतल्याचे बोलले जात आहे. ‘जवान’साठीही तिने तेवढीच रक्कम घेतली होती.