नगर -नगर शहर व जिल्ह्यातील अनेक खासगी शाळांमधून विद्यार्थ्यांच्या पुढील वर्षाच्या शैक्षणिक शुल्कासाठी तगदा सुरु आहे. विद्यार्थ्यांचे शुल्क न भरल्यास त्या विद्यार्थ्यांचे पुढील वर्षांचे शैक्षणिक प्रवेश रद्द करण्याबाबतचे इशारे दिले जात आहेत. त्यामुळे अशा शाळा व्यवस्थापनांवर तातडीने कडक कारवाई करावी, अशी मागणी सामजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी केली आहे.
नगर शहरातील काही शाळांमधून पालकांना थेट फोन करुन या संदर्भात तगदा केला जात आहे. अनेक पालकांच्या मोबाईलवर शैक्षणिक शुल्क भरण्याबाबत मेसेज पाठविले असून, शैक्षणिक शुल्क भरण्याची सक्ती केली आहे.
दरम्यान, हा प्रकार खासगी शाळांमधूनच सुरु आहे. या संदर्भात बोज्जा यांनी राज्याचे शिक्षणमंत्री, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, यांच्याकडे लेखी निवेदन पाठविले आहे. लॉकडाऊन उठेपर्यंत कोणत्याही शाळांनी शैक्षणिक शुल्क आकारू नये, असे आदेश राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनीच काढले आहेत. तरीही काही शाळा शुल्क भरण्यासाठी पालकांवर दबाव आणीत आहेत, असा दावा बोज्जा यांनी केला आहे. एकीकडे जगण्याची लढाई सुरु असताना अशा वाईट परिस्थितीत शैक्षणिक शुल्क कोठून भरावे, असा प्रश्न आहे. त्यामुळे अशा शाळांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी बोज्जा यांनी केली आहे.