नगर -करोना साथीवर अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथी औषधाचा प्रतिकारशक्ती वाढवण्यात खूप फायदा होत असल्याने आयुष मंत्रालयाने नमूद केले आहे. करोना प्रतिबंधक उपाय म्हणून व करोना विरुद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनचे अध्यक्ष ऍड. रवींद्र शितोळे यांनी “डॉक्टर आपल्या दारी’ ही सावेडी उपनगरात आगळीवेगळी संकल्पना राबवली आहे.
करोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता सावेडी उपनगरातील प्रभागांमध्ये हा उपक्रम लायन्स क्लबच्या सचिव डॉ.कल्पना ठुबे यांच्या मदतीने राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून राजमाता कॉलनी परिसरात करोनाशी लढा व त्याचा प्रतिबंध हे माहितीवजा व्याख्यान व मोफत अर्सेनिक अल्बम 30 चे वाटप करण्यात आले. यावेळी ऍड. रवींद्र शितोळे, नगरसेवक अजिंक्य बोरकर उपस्थित होते. यावेळी बोरकर म्हणाले की, महामारीच्या साथीवर अर्सेनिक अल्बम 30 या औषधी गोळ्यांचे वाटप सध्याच्या काळाची गरज आहे.