शिरूर लोकसभा व हडपसर विधानसभा मतदारसंघात पवारॲक्शन मोडमध्ये
विवेकानंद काटमोरे
मांजरी : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आगामी निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय. राष्ट्रवादीतील शरद पवार यांच्या बाजूने असणारे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांना अजित पवारांनी थेट आव्हान दिलंय.खासदार कोल्हे यांच्या विरोधात उमेदवार देणार अन् तो मोठ्या फरकाने निवडून आणणार, असं पवार काल म्हणालेत. त्यानंतर आज अजित पवार शिरूर लोकसभा मतदारसंघात असणाऱ्या हडपसर येथे ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळाले. येथेही त्यांनी आपलं ठरलं ते ठरलं असे सांगत कालच्या चॅलेंजवर ठाम असल्याचे स्पष्ट केले. अजित पवारांनी आज सकाळी सकाळी लवकर मांजरी बुद्रुक परिसरातील विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी हडपसरचे आमदार चेतन तुपे देखील अजित पवार यांच्यासोबत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी सकाळी साडेसहा वाजताच कामाला सुरुवात केली. मांजरी बुद्रुक येथील पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेण्यासाठी सकाळीच पंधरा नंबर लक्ष्मी कॉलनी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पावर दाखल झाले. त्यानंतर त्यांनी गोपाळपट्टी येथील रेल्वे उड्डाणपूल व मुळा-मुठा नदीवरील पुलांची पाहणी केली.हडपसर विधानसभा मतदार संघाचे आमदार चेतन तुपे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अमोल पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप घुले, मतदार संघाचे अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे आदिंसह विविध पक्षांचे पदाधिकारी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
त्यांची प्रतिक्रिया त्यांना लखलाभ; माझं काल जे ठरलं ते फायनल- अजित पवार
काल तुम्ही खासदार कोल्हेना चॅलेंज दिलं. त्यानंतर आज तुम्ही शिरूर मतदारसंघात आला आहात, असा प्रश्न विचारताच अजित पवार यांनी त्याला उत्तर दिलं. काल दिलेल्या चॅलेंजचा आणि आज केलेल्या पाहणीचा काहीही संबंध नाही.आमदार चेतन तुपे यांनी अधिवेशनादरम्यान या कामाची पाहणी करण्याची मागणी केली होती. त्यामुळे मी आज इथं आलो. लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सकाळी पाहणी केली, असं अजित पवार म्हणाले.परंतु आपल्या चॅलेंज नंतर खासदार कोल्हे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर विचारातच अजित पवारांनी सांगितले की त्यांची प्रतिक्रिया त्यांनाच लखलाभ, परंतु माझं काल जे ठरलं ते फायनल !
ठेकेदाराचा सत्कारच करायला हवा; अजित पवारांनी ठेकेदार व अधिकाऱ्यांना सुनावले
मांजरी बुद्रुक रेल्वे गेटवरील उड्डाणपूल आणि मुळा-मुठा नदीवरील पुलांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. मात्र या दोनही पुलांच्या कामाच्या दर्जाबाबत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारच्या निकृष्ट दर्ज्याच्या बांधकामाबद्दल काम करणाऱ्या ठेकेदाराचा सत्कारच करायला हवा अशा शब्दांत त्यांनी पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावले.
आत्तातरी मांजरीकरांच्या पाण्याचा आणि उड्डाण पुलाचा प्रश्न सुटेल ?
अजित पवार यांनी आज मांजरी बुद्रुक मधील विकासकामांची पाहणी केली. मांजरी पाणीपुरवठा योजनेची पंधरा नंबर येथे तसेच मांजरी रेल्वे गेट व मुळा-मुठा पुलाच्या कामाची पाहणी केली. गेली अनेक वर्षांपासून पासून ही कामे सुरू आहेत . परंतु अपेक्षित अशी पूर्ण झाली नाहीत. याशिवाय पुलाचे बांधकाम चुकीचं झाल्याचा स्थानिकांनी आरोप केला आहे. शिवाय ज्यांची जमीन गेली आहे. त्यांना अद्याप योग्य मोबदला दिला गेलेला नाही. या पुलावर वारंवार अपघात घडत असल्याचेही नागरिकांनी त्यांच्या लक्षात आणून दिले.याची दखल घेत अजित पवारांनी उपस्थित अधिकारी व जे उपस्थित नव्हते त्यांना संपर्क साधून चांगलेच सुनावले व ही कामे लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यामुळे मांजरीकरांना लवकरच शुद्ध पाणी आणि सुखकर प्रवास करता येईल.