सातारा – जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही अनेक नागरिक प्रशासनाच्या सूचना पाळत नसल्याने शाहूपुरी ग्रामपंचायतीची ग्रामस्तरीय समिती आणि पोलिस यांच्यावतीने बुधवारी जोरदार मोहीम राबवण्यात आली. विनामास्क फिरणारे, प्रशासनाच्या सूचना न पाळणारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
सातारा शहरात दिवसेंदिवस करोना प्रादुर्भाव वाढू लागला आहे. परिसरातील उपनगरांमध्येही बाधित रुग्ण आढळत आहेत. शाहूपुरीत बाधितांचे प्रमाण कमी असले तरी करोनाचा फैलाव वाढू नये, यासाठी प्रशासनाने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. करोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानुसार ग्रामदक्षता समिती स्थापन करण्यात आल्या आहेत.
प्रशासनाच्या सूचनांचे पालन न करणे, विनामास्क फिरणे, वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांवर शाहूपुरी ग्रामस्तरीय समिती आणि पोलिस यांच्या संयुक्त पथकाने शाहूपुरी चौक, मोळाचा ओढा, करंजे नाका, दौलतनगर आदी परिसरात कारवाई केली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा सोमवारपासूनच उगारण्यात आला असल्याचे सरपंच गणेश आरडे यांनी सांगितले.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विशेषतः वाहन चालकांकडून आठ हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय संबंधित दुकानदारांना फिजिकल डिस्टन्सिंग, दुपारी दोननंतर दुकान सुरू न ठेवण्याबाबत समज देण्यात आली. ग्रामविकास अधिकारी मोहन कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल खंडागळे, सौरभ चौधरी, रविराज गायकवाड, सौ. विजया निलाखे, सौ. वैशाली जाधव यांनी या कारवाईत सहभाग घेतला. पोलिस हवालदार एम.जी. कोकणी, अजित माने, विकास शिंदोळकर, पोलीस पाटील अर्जुन पवार, कृषी सहाय्यक प्रवीण नलावडे यांनी मदत केली.