मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या डॉक्टरांपैकी आतापर्यंत 99 डॉक्टरांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची धक्कादायक माहिती डॉक्टरांची संघटना इंडियन मेडिकल असोसिएशनने दिली आहे. तर आतापर्यंत 1302 डॉक्टरांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे.
विशेष म्हणजे सर्वसामान्य नागरिकांपेक्षा डॉक्टरांचा मृत्युदर जास्त आहे. या सर्व पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनने देशातील सर्व सदस्य डॉक्टरांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. कोरोना विषाणू संसर्ग देशात झपाट्याने वाढत आहे. या संकटाशी सामना करण्यासाठी सरकार, प्रशासन, डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी असे सर्वजण अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र, या कोरोना विषाणू सोबतच्या युद्धात आघाडीवर लढत आहेत ते म्हणजे डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी. याचा फटकाही त्यांना अधिक बसत आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने या संदर्भात संघटनेच्या सर्व सदस्यांना आता रेड अलर्ट जारी केला आहे.
सरकारने अद्याप किती डॉक्टरांचे मृत्यू झाले हे जाहीर केले नाही. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती फार वेगळी आहे. याचसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने देशातील सर्व सदस्य डॉक्टरांकडून वैयक्तीक फॉर्म भरुन घेतल्यानंतर ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
संघटनेने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार देशभरात आतापर्यंत 99 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. तर 1302 डॉक्टरांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. 99 पैकी 73 डॉक्टरांचं वय हे 50 च्या पुढील आहे. तर 19 डॉक्टर हे 35 ते 50 वयोगटातील आहे. 1302 संक्रमित डॉक्टरांपैकी 586 डॉक्टर्स हे प्रॅक्टीसिंग आहे तर 566 डॉक्टर्स हे निवासी आहेत.