सोरतापवाडी, {प्रभात प्रभाव} – काळ्याकाचे खाली दडलंय काय? या मथळ्याखाली दैनिक प्रभातमध्ये 6 एप्रिल रोजी बातमी येताच लोणी काळभोर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांनी काळ्या काचा असणार्या गाड्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. आज (9 एप्रिल) पुणे – सोलापूर महामार्गावर कवडीपाट टोलनाका येथे ही कारवाई चालू केली असून काळ्या काचा असणार्या गाड्यांवर दंड करण्याचे काम वाहतूक शाखेचे पोलीस करीत आहेत.
चारचाकी गाडीच्या काळ्या काचेच्या नावाखाली अनेक गैर धंदे सुरू असून, दारू वाहतूक, गुटखा वाहतूक व इतर धंदे सर्रास चालू असल्याबाबत बातमीमधून प्रकाश टाकला होता. त्याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याचे सांगण्यात आले होते. ही बातमी येताच वाहतूक शाखेने जोरदार कारवाई चालू केली. अनेक गाडीमालकांकडून दंड आकारण्यात येत असून काही गाड्यांचे फिल्मिंग काढण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांनी दिली.
हडपसरपासून उरुळी कांचनपर्यंत अनेक ऊंचे लोग ऊंची पसंती या जाहिराती प्रमाणे मोठ्या किमतीच्या चारचाकी गाड्या घेतल्या आहेत. त्यावर काळी फिल्मिंग केलेले आहे. असे करणे बेकायदेशीर असून वाहतूक नियमांनुसार कारच्या काचेवर काळी फिल्मिंग केल्यास दंड आकारण्यात येतो.
वाहतूक पोलीस मात्र या मोठमोठ्या किमंतीच्या गाड्या बघून सोयीस्कर दुर्लक्ष करत होते. त्यामुळे पोलिसांचा वचक कमी पडतो की काय, असे नागरिकांना वाटत असल्याचे दैनिक प्रभात मधून मांडण्यात आले. पण आजच्या कारवाईने पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवला आहे. त्यामुळे काळ्या काचा लावणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
मोटर वाहन कायदा कलम 100/177 प्रमाणे कारवाई सुरू असून त्यामध्ये फिल्मिंग करणार्या वाहनधारकाला एक हजार रुपयापर्यंत दंड आकारला जातो. त्यामुळे सर्व नागरिकांना असे आवाहन करण्यात येते की ज्यांनी फिल्मिंग केले आहे त्यांनी ते स्वतःहून काढावे अन्यथा या दंडात्मक कारवाईला सामोरी जावे लागेल. फिल्मिंग केलेल्या गाड्यावर कारवाई करणार असून वाहतूक शाखा कुणालाही पाठीशी घालणार नाही. -कुमार घाडगे, पोलीस निरीक्षक लोणी काळभोर वाहतूक शाखा