पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – जमिनीच्या दर्जाप्रमाणे आणि हवामानानुसार शेतातील पीकांना पाणी, खते, ऊन किती प्रमाणात आवश्यक आहे, पीकांची परिस्थिती आणि उत्पन्न, त्यांच्यावरील कीड याची माहिती शेतकऱ्यांना स्मार्टफार्म सिस्टिमद्वारे मिळणार आहे. शेतकरी आपल्या मोबाइलद्वारे या सिस्टीमचा वापर करू शकतील. येत्या काही दिवसांत हे यंत्र शेतकऱ्यांना खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. कमी किंमतीत हे यंत्र सी-डॅककडून लवकरच उपलब्ध होणार आहे.
सी-डॅकद्वारे आयोजित पत्रकार परिषदेत कार्यकारी संचालक कर्नल ए. के. नाथ (निवृत्त) आणि अनिश सत्या यांनी ही माहिती दिली. सी-डॅक त्रिवेंद्रमच्या टीमने “मेक इन इंडिया’अंतर्गत स्मार्टफार्म सिस्टीम तयार केली आहे.
या सिस्टीमचा वापर केरळमधील कृषी महाविद्यालयाच्या सहाय्याने विविध भाज्यांच्या शेतीमध्ये करण्यात आला. या सिस्टीमच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे ही सिस्टीम सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी वापरण्याचा निर्णय झाल्याची माहिती डॉ. नाथ यांनी दिली.
या सिस्टीममध्ये सेन्सरची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. अधिकाधिक ३२ सेन्सर लावण्यात येईल. या सेन्सरद्वारे फळांच्या झाडांना किंवा भाज्यांना, पिकांना आवश्यकतेप्रमाणे स्प्रिंकलर, ठिबक सिंचनाद्वारे पाणी आणि खते देण्यात येतात.
हवामानाची परिस्थिती, पीकांचे अॅनॅलिसिस आणि त्याचप्रमाणे पीकांना कीड लागू नये याची काळजी, आदींची माहिती सिस्टीमद्वारे सांगण्यात येते. इंटरनेटची सुविधा कमी ते उत्तम परिस्थितीत असणाऱ्या सर्व ठिकाणी ही सिस्टीम सहज कार्यान्वित येते. ही सिस्टीम मोबाइललशी कनेक्टेड असेल. त्याचप्रमाणे मोबाइल अॅपसुद्धा तयार करण्यात येत आहे, असे सत्या यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना स्वस्तात उपलब्ध होणार
स्मार्टफार्म सिस्टीम शेतात बसविण्यासाठी खर्च हा जमिनीच्या क्षेत्रफळानुसार कमी-जास्त होऊ शकतो. साधारण एक एकरच्या परिसरात ही सिस्टीम बसविण्यासाठी ५० हजार ते एक लाखांपर्यतचा खर्च येऊ शकतो. सध्या बाजारपेठेत उपलब्ध असणाऱ्या प्रणाली या परदेशी असून, त्या परदेशातील जमीन आणि हवामानानुसार तयार करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे ही सिस्टीम शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. ही सिस्टीम नामांकित कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी किंमतीत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे नाथ आणि सत्या यांनी सांगितले.