सोरतापवाडी (वार्ताहर) – एकूणच विकासाचे राजकारण बाजूला सारून शिरूर लोकसभेची निवडणूक मतदारांना भावनिक करून लढण्याचा विचार सध्या दोन्ही बाजूंनी सुरू असून जागरूक मतदार कोणाला मतदान करतील हे मतमोजणीच्या म्हणजे 4 जुनच्या दिवशी कळेल.
आजी-माजी खासदारांच्या विकास कामाबाबत बोलायचे झाले तर दोघांनी देखील बर्यापैकी निधी पूर्व हवेलीत आणलेला आहे. तसेच मतदार संघामध्ये दोघांचा संपर्क तसा शेवटच्या घटकापर्यंत अजूनही पोहचलेला नाही. शेवटची निवडणूक लढणार असे म्हणून शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले असुन याला मतदार कशी दाद देतील हे देखील पहाण्याजोगे ठरणार आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचाराचे वारे सध्या जोरात सुरू असून दोन राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच काट्याची टक्कर दिसून येत आहे. यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात तुतारी वाजणार की घड्याळ चालणार, याविषयी नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर साहेबांकडे जायचं का दादांकडे? या विचाराने अजूनही नेते संभ्रमावस्थेत असून कार्यकर्ते मात्र स्थिर आहेत; परंतु मतदार हे नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे ऐकणार का हे निकालानंतरच कभळणार आहे. महाविकास आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे व महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लोकसभेच्या जागेसाठी सामना रंगणार आहे.
पूर्व हवेलीतील अजुनही दोन्ही उमेदवार सहकारी पक्षांतील स्थानिक नेत्यांना बरोबर घेऊन प्रचार करण्यात कमी पडत असून कार्यकर्ते मात्र शांतच असल्याचे दिसून येत आहे. अनेक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की नेते स्वतःच्या सोयीनुसार राजकारण करत असून कार्यकर्त्यांना विचारता न घेता निर्णय घेत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नुकत्याच झालेल्या थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील आहे.
या निवडणुकीसाठी सुरुवातीला छोट्या मोठ्या अनेक बैठका पार पडल्या त्यामध्ये बिनविरोध निवडीचा सूर पुढे आला; परंतु पॅनल बनवताना संधी साधुनां संधी दिल्यामुळे अनेक सभासद नाराज झाले. त्याचा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते असलेल्या पॅनलचा पराभव झाला.
या निवडणुकीवरून अनेक कार्यकर्त्यांना झटका बसल्यामुळे कार्यकर्ते आता स्थिर होऊन शांत झाले आहेत. तर निवडून आलेल्या पॅनलचे असे म्हणणे आहे की आपल्याला कारखाना चालू करण्यासाठी कोणाचाही उघड प्रचार करण्यात येणार नाही. त्यामुळे पूर्व हवेलीत उष्ण वातावरणात प्रचार थंड चालू आहे.
आमने सामने लावणे
1. महायुतीत पदाधिकार्यांनी जागरुक रहावे
पूर्व हवेली तसा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. या मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट) व भाजप नेते घड्याळाची वेळ सेट करण्यात व्यस्त असले तरी कार्यकर्ते नेमकी आता कोणती भूमिका घेतील याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये एकी नसल्याचा फटका मतदानाला बसण्याची शक्यता असून पदाधिकार्यांनी याबाबत जागरूक राहणे गरजेचे आहे.
2. आघाडीत सहकारी पक्षांवर मदार
महाविकास आघाडी मध्ये पूर्वी असणारी मातब्बर मंडळी युतीमध्ये गेल्याने सध्या डॉ. अमोल कोल्हे यांना नवीन मंडळींवर विश्वास ठेवून चालावे लागत आहे. सहानभुतीची लाट त्यांच्या बाजूने असली तरी किंगमेकर असणारी सर्व पदाधिकारी मात्र अजित पवार यांच्या गटात गेल्याने वेगळी अशी रणनीती त्यांना ठरवावी लागणार आहे. महाविकास आघाडीमधील इतर पक्ष शिरूर-हवेलीत तुतारी वाजविण्यास मदत करणार का? हा देखील प्रश्न गुलदस्त्यात सध्या आहे.