पिंपरी – महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी जागेवर नसल्याची वारंवार उदाहरणे समोर आल्यानंतर जानेवारीमध्ये सामान्य प्रशासन विभागाने पथकांची नेमणूक करून पाहणी केली होती. या पाहणीत महापालिका मुख्यालयासह क्षेत्रीय कार्यालये, पालिका रूग्णालयात तब्बल 235 अधिकारी, कर्मचारी जागेवर हजर नसल्याचे समोर आले होते. या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करून 15 मे पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे यांनी दिले आहेत.
महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यामुळे 12 मार्च 2022 पासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह हेच प्रशासक म्हणून कामकाज पाहत आहेत. पालिकेत विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना अधिकारी, कर्मचारी भेटत नाहीत. कार्यालयीन वेळेत नेमून दिलेल्या जागेवर हजर राहत नसल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या. पर्यायाने आयुक्त सिंह यांच्या कारभारवरच नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात होती.
18 जानेवारी 2023 रोजी सामान्य प्रशासन विभागाने विविध पथकांची नेमणूक करत महापालिका मुख्यालय, क्षेत्रीय कार्यालये, पालिकेची रूग्णालये, दवाखान्यांची पाहणी केली. या पाहणीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कनिष्ठ कर्मचाऱ्यापर्यंत असे तब्बल 235 जण जागेवर नसल्याचे पथकाच्या निदर्शास आले. तसा अहवाल सामान्य प्रशासन विभागाने तयार करून संबंधित विभागातील प्रमुखांना अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
विभाग प्रमुखांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर शिस्तीबाबत नियमाधीन असलेली ठोस अशी कारवाई करावी. तसेच या कारवाईचा अहवाल 15 मे पर्यंत सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करावा, असा आदेश सहाय्यक आयुक्त नेमाणे यांनी नुकतेच दिले आहेत.
नागरिकांना भेटीसाठी वेळ निश्चित
नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक, पदाधिकारी, ठेकेदार व त्यांचे प्रतिनिधी अधिकारी व विभागप्रमुखांना भेटण्यासाठी पालिका भवनात येतात. मात्र, दौरा, मिटींग, साईट व्हिजिट, रजा आदी विविध कारणांमुळे अधिकारी नागरिकांना भेटत नाहीत. हेलपाटे मारूनही अधिकारी भेटत नसल्याने कामे अडतात. त्यामुळे दुपारी 4 ते 5 या वेळेत अधिकाऱ्यांनी नागरिकांना भेटावे. ती वेळ नागरिकांसाठी राखून ठेवावी. नागरिकांसाठी राखून ठेवलेल्या भेटीचा कालावधी सर्व कार्यालयांनी त्यांच्या सूचना फलकावर ठळकपणे लावावा, अशा सूचना आयुक्तांनी विभागप्रमुखांना यापूर्वीच दिलेल्या आहेत. त्यानुसार अनेक विभाग प्रमुखांच्या कार्यालयाबाहेर भेटीबाबत ठळकपणे फलक लावलेले दिसून येत आहेत.