गोंदिया : विदर्भातील गोंदियात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर जीवघेणा ऍसिड हल्ला करण्यात आला आहे. गोंदियाच्या खळबांधा गावात राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर दोन अज्ञात इसमांनी ऍसिड टाकत पळ काढला. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर नागपुरातील रुग्णालयात उपचार सुरु आहे.
खळबांधा गावात राहणारी सदर तरुणी ही नागपुरच्या प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिल इंजिनियरींगचे शिक्षण घेत आहे. महाविद्यालयाला सुट्या असल्याने काही दिवसांपूर्वी ती गावी आली होती. आज ती पुन्हा कॉलेजसाठी नागपूरला जाण्याकरीता खळबांधा गावातून मुंडीपार बस स्थानकावर आली होती.
यावेळी दोन अज्ञात तरुणांनी एका दुचाकी वाहनावर कापड बांधून येत तरुणीवर ऍसिड टाकत पळ काढला. तिच्या अंगावर ऍसिड टाकल्यानंतर ती मुलगी बस स्थानकावर आरडाओरड करु लागली आणि तडफडू लागली. गावकऱ्यांनी याची सूचना पोलिसांना देत सदर मुलीला गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.
मात्र तिची प्रकृती अधिक बिघडत चालल्याने तिला पुढील उपचाराकरता नागपूरला हलविण्यात आले. गंगाझरी पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. हा हल्ला कोणत्या कारणातून झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.